महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाव तिथं 'कोहिनूर' स्थापन्याचं मनोहर जोशींचं होतं ध्येय; चार विद्यार्थ्यांपासून झाली होती सुरुवात - मनोहर जोशी

Manohar Joshi Passed Away : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनानं राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाली. मनोहर जोशी यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली होती. ही संस्था अवघ्या चार विद्यार्थ्यांवर सुरू झाली होती.

Manohar Joshi Passed Away
Manohar Joshi Passed Away

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 12:24 PM IST

मुंबई Manohar Joshi Passed Away : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. मनोहर जोशी यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भिक्षुकीपासून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास लोकसभा अध्यक्ष पदापर्यंत झाला. मात्र राजकारणापेक्षा मनोहर जोशी यांचं उद्योजक होण्याचं स्वप्न होतं. मराठी माणसानं उद्योग करावेत, असा त्यांचा ध्यास होता. त्यामुळंच त्यांनी मुंबई महापालिकेतील लिपिक पदाची नोकरी सोडून दादरमध्ये कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली होती. अवघ्या चार विद्यार्थ्यांवर 'कोहिनूर' संस्था सुरू झाली होती. आज मात्र देशातील एक नामांकीत टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून कोहिनूरचं नाव घेतलं जाते.

चार विद्यार्थ्यांवर सुरू झाली कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट :मराठी माणसाला विकास करायचा असेल, तर त्यानं उद्योग धंद्यात यावं, असा मनोहर जोशींचा ध्यास होता. त्यासाठी मनोहर जोशी यांनी दादरमध्ये 7 डिसेंबर 1961 ला 'कोहिनूर' या संस्थेची स्थापना केली. ही संस्था सुरू झाली तेव्हा, केवळ चार विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत होते. केवळ चार विद्यार्थ्यांवर ही संस्था सुरू झाल्यानंतर अल्पावधितच संस्थेनं मोठा नावलौकिक मिळवला. आज देशात महत्वाची शैक्षणिक संस्था म्हणून कोहिनूर इन्स्टिट्यूटचं नाव घेण्यात येते.

गाव तिथं बस स्थानक तसं गाव तिथं कोहिनूर :मनोहर जोशी यांनी दादरमध्ये सुरू केलेली कोहिनूर संस्था गावागावात नेण्याचा ध्यास मनोहर जोशी यांनी घेतला होता. या संस्थेनही अल्पावधितचं मोठा नावलौकिक मिळवून अनेक तरुणांना रोजगार मिळवून दिला. मनोहर जोशी यांनी गाव तिथं बस स्थानक तसं गाव तिथं कोहिनूर ही संकल्पना पुढं आणली. त्यामुळं कोहिनूर संस्थेचं राज्यात जाळं पसरलं. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिकवणारी कोहिनूर संस्था देशभरात नावलौकिक मिळवत आहे. आज सहा राज्यात कोहिनूर संस्थेचं जाळं पसरलं आहे. तर देशातील महत्वाच्या शहरात कोहिनूर संस्थेच्या शाखा आहेत. कोहिनूर या संस्थेत प्राचार्य म्हणून मनोहर जोशी यांनी काम केलं. त्यामुळं राजकारणात असूनही त्यांना सर म्हणूनच ओळखलं जाते.

कोहिनूर भूखंडाचा वाद :कोहिनूर संस्थेनं राज्यभरात आपलं जाळं निर्माण करुन अनेकांना रोजगार दिला. मात्र त्यापाठोपाठ वादही कोहिनूर संस्थेमुळे निर्माण झाले. राज ठाकरे आणि मनोहर जोशी यांनी एक भूखंड घेतला होता. या भूखंडाची किंमत 400 कोटी रुपये होती. अतिशय कमी कालावधित ही रक्कम उभारल्यानं मनोहर जोशी यांच्यावर आरोप झाले. राजकारणातील सुसंस्कृत असलेल्या मनोहर जोशींवर यामुळे मोठी टीका करण्यात येत होती.

हेही वाचा :

  1. राजकारणातील 'कोहिनूर' हरपला; मनोहर जोशी यांचं मुंबईत निधन
  2. भिक्षुकी ते लोकसभा अध्यक्ष; मनोहर जोशींची थक्क करणारी 'संघर्षगाथा'

ABOUT THE AUTHOR

...view details