मुंबई Manohar Joshi Passed Away : राजकारणातील शालीन व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे 03.02 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाची अपरिमित हानी झाली आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानं झालं निधन :लोकसभा माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलं होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यातच गुरुवारी पहाटे 03.02 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात येणार पार्थिव :मनोहर जोशी यांचं निधन झाल्यानं महाराष्ट्रातील राजकारणाची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक म्हणून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सुपरिचित होते. त्यामुळं त्यांच्या अंत्यदर्शनाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मनोहर जोशी यांचं पार्थिव त्यांच्या माटुंगा पश्चिम इथल्या रुपारेल महाविद्यालयाजवळील त्यांच्या 'डब्ल्यू 54' निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजतापर्यंत त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर दुपारी 2 वाजतानंतर मनोहर जोशी यांची अंत्ययात्रा सुरू होणार आहे. त्यानंतर दादर इथल्या स्मशानभूमित त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. विशेष म्हणजे मनोहर जोशी यांना मे 2023 मध्येही दीर्घ आजार झाला होता. मात्र या आजारावर त्यांनी मोठ्या जिद्दीनं मात केली होती.
हेही वाचा :
- MLA Sada Sarvankar Claimed : 'मातोश्री'वरून होता मनोहर जोशींच्या घरावर हल्ला करण्याचा आदेश; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट
- Manohar Joshi : 'या' कारणामुळे मनोहर जोशी मुख्यमंत्रिपदावरून झाले होते पायउतार
- Uddhav thackeray: मनोहर जोशी आणि ठाकरेंमध्ये दिलजमाई वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा