नाशिक Manjarpada Water Project : मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आज येवल्यातील डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झालं. मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे साठवण तलावात आलेल्या पाण्याचं जलपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झालं. गावकऱ्यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत पाण्याचं जलपूजन करण्यात आलं.
स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आंनद : "येवले येथील जनतेला दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आंनद असून भविष्यातही कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही. तसंच मांजरपाडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नाही, तर पार-गोदावरी उपसा जोड योजना क्र. 3 व 4च्या माध्यमातून पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे 500 मीटर पर्यंतच्या लेवलचे 5 टी.एम.सी. पाणी लिफ्ट करुन आपण मांजरपाडा मध्ये आणणार आहोत. हे पाणी पुणेगाव दरसवाडी मार्गे येवल्याला आणणार असून येवल्याची तहान भागून आपण वैजापूर, संभाजीनगरला सुद्धा पाणी देणार आहोत," असं प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केलं.
धरणाची क्षमता वाढणार : "तब्बल पन्नास वर्षानंतर येवलाकरांचं स्वप्न पूर्ण झालंय. मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून येवलेकरांना पाणी उपलब्ध झालं. या योजनेचा DPR सुद्धा तयार झालेला आहे. मेरीच्या SLTAC कमिटीच्या मान्यतेनंतर हा DPR शासनाकडे मंजुरीसाठी येणार. आगामी काळात दरसवाडी धरणाची क्षमता सुद्धा वाढवू. पुणेगावला आणखी पाणी कुठून आणता येईल, याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव व नरहरी झिरवाळ यांच्याशी चर्चाही झाली. मांजरपाडा-गुगुळ या प्रवाही वळण योजना राबवून या वळण योजनांचं पाणी पुणेगावमध्ये आणण्यासाठी सर्वेक्षण करुन DPR तयार करण्याणच्या सुचना दिलेल्या आहेत," असं मंत्री भुजबळ यांनी म्हटलं.
प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी : "दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवल्याला कुठल्याही परिस्थिती पाणी आणण्याचं, असा निश्चय आपण केला होता. येवलेकरांना पाणी आणण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपण चंग बांधला होता. आज अनेक अडचणींवर मात करत, डोंगरगावमध्ये पाणी आलं असून दिलेला शब्द पूर्ण केला. येवला तालुक्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचं पाणी लवकरच उपलब्ध होईल, " असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
गुजरातला जाणारं पाणी वळवलं :"येवला मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामं केली. आता पिंपळस ते येवला रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी 560 कोटी रुपये मंजूर होऊन लवकरच काम सुरू होईल. राजापूरसह 41 गाव पाणी पुरवठा योजनेसाठी 188 कोटी, धुळगावसह 16 गावं पाणी पुरवठा योजनेसाठी 73 कोटी, येवला शहरात 88 कोटी रुपयांची कामं सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 2006 साली झालेला कालवा 2019 पर्यंत पडीक असल्यानं अनेक अडचणी होत्या, कालव्याची दुरवस्था झालेली. यासंदर्भात तज्ज्ञ मंडळी व प्रशासनाची बैठक घेतल्यानंतर कालव्याचं नव्यानं विस्तारीकरण व अस्तरीकरण करावं लागलं. दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचं काँक्रीटीकरण व अस्तरीकरणासाठी 242 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली. काम वेगानं होण्यासाठी कालव्यावर प्रत्येक 20 किमी अंतरावर आधुनिक यंत्रांद्वारे काम हे काम सुरू होतं. दीड वर्षांची मुदत असलेलं हे काम अवघ्या 6 महिन्यांत जवळपास 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं. मांजरपाडा पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली आहे, बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आवक सुरू झाली. पुनेगाव व दरसवाडी धरण भरून पाणी येवल्याच्या हद्दीत दाखल झालं", असं छगन भुजबळ म्हणाले.
'भुजबळ कालवा' नाव द्या येवलेकरांची मागणी :मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमांतून डोंगरगाव साठवण तलावात पाणी पोहचलं. या पाण्यामुळे तीन पिढ्यांचं स्वप्न साकार झालं. त्यामुळं या कालव्याला 'भुजबळ कालवा' नाव द्यावं, अशी मागणी पाणी आंदोलक डॉ.मोहन शेलार यांनी केली.
हेही वाचा
- रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक; गणपती खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची होणार गैरसोय - Mumbai Local Mega Block
- "सामान्य कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री", मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जीवनावर आधारित 'जे पाहता रवी' पुस्तकाचं प्रकाशन - Ravindra Chavan
- ठाण्यात पुन्हा २ वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करुन लैंगिक अत्याचार, सात महिन्यात २३३ अल्पवयीन मुली नराधमांच्या भक्ष्यस्थानी - Sexually assault