नागपूर Mango Millet Festival Nagpur 2024 :पुणे इथं झालेल्या आंबा महोत्सवाच्या धर्तीवर नागपूर शहरात सुद्धा आंबा, तृणधान्य आणि धान्य महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. 19 मेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले. महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयामार्फत उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन इथं आंबा महोत्सव सुरू झाला. या महोत्सवामध्ये सहभागी उत्पादकांचे 40 ते 50 स्टॉल्स आहेत. तृणधान्यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन, कोकणातील हापूस, केशर आणि इतर आंबा प्रदर्शन आणि विक्री यावर आंबा महोत्सवात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आंबा महोत्सवात देवगडचा हापूस ते गडचिरोलीचा 'गोला' :कोकणातल्या देवगड हापूस आंब्यापासून थेट गडचिरोली जिल्ह्यातील जीवनगट्टा गावच्या ‘गोला’या देशी आंब्यापर्यंत आंबे या महोत्सवात आहेत. त्यासह खान्देशच्या ज्वारीच्या लाह्यापासून वर्धा आणि नागपुरातील केसर, दशेरी ते सफेदापर्यंतची वैविधता ‘आंबा मिलेट धान्य महोत्सवाचे’ वैशिष्टय ठरलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशानं आंबा मिलेट धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
हापूसच्या रांगेत गोला आंबा : देवगडचा हापूस आंबा सुप्रसिद्ध आहे. मात्र त्याच्या जोडीनं गडचिरोलीतील दुर्गम आदिवासी गाव असलेल्या जीवनगट्टा या गावात गोला हा आंबा देशी आंबा विकसित झाला. त्यामुळे देवगडच्या हापूसच्या पंगतीत गोला हा आंबा बसवणारी प्रणाली गावडे या तरुणीचं विशेष कौतुक होत आहे. प्रणाली गावडे ही तरुणी जीवनगट्टा या गावात राहणारी आहे. कृषी पदवी संपादन करुन प्रणाली गावडे या तरुणीनं आपल्या कौशल्यावर वैविध्यपूर्ण आंबाडी, टोमॅटो, लसून लोणच्यासह गावातील देशी गोला आंब्याला हापूसच्या रांगेत आत्मविश्वासानं बसवलं आहे. गावची ती पहिलीच महिला कृषी पदविधारक आहे. प्राणालीच्या आईनं स्थापन केलेल्या आदिवासी महिला बचत गटाला आता कृषी शिक्षणाची जोड देवून मूल्यवृद्धी कशी करता येईल, याचा प्रणाली प्रयत्न करत आहे.