मुंबई Ganeshotsav 2024: मुंबई म्हटलं की, कुणाच्याही डोळ्यासमोर इथली झगमगती दुनिया उभी राहते. इथली फिल्म सिटी, गरवारे स्टेडियम, वानखेडे स्टेडियम, महालक्ष्मी रेस कोर्स अशी प्रसिद्ध मैदाने येथे आहेत. मात्र, आज मुंबई क्रिकेटसाठी ओळखली जात असली तरी, कबड्डी हा मुंबईकरांचा डीएनए आहे असं म्हटलं जातं. तर याची सुरुवात झाली गिरणी कामगारांपासून.
गिरणी कामगारांच्या मुंबईला सुरुवात : आज मुंबईला आपण देशाची आर्थिक राजधानी म्हणतो. पण, प्राचीन काळापासूनच मुंबई एक व्यापारी शहर राहिलं आहे. कालांतरानं मुंबईवर इंग्रज, पोर्तुगीज यांनी राज्य केलं. व्यापार वाढला तसा काळ ही बदलला, गिरणी आल्या आणि सुरुवात झाली गिरणी कामगारांच्या मुंबईला. हे कर्मचारी सकाळी गिरणीवर जात संध्याकाळचा भोंगा वाजला की, पुन्हा घरी येत. यातूनच कामगार संघटना उभ्या राहिल्या आणि सुरुवात झाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची. या गिरणी कामगारांसाठी ज्या चाळी बांधल्या त्या चाळींचे देखील स्वतःचे गणपती होते. त्यातीलच एक चाळ म्हणजे 'मानाजी राजूजी चाळ'.
कबड्डीची परंपरा ठेवली कायम : आज गणपती म्हटलं की डीजे, नाच-गाणी धांगडधिंगा पहायला मिळतो. मात्र, मुंबईत गिरणी कामगारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले होते. पूर्वी गणपतीत नाटक, कीर्तन, नमन असे पारंपरिक कलाप्रकार सादर केले जायचे. यातच आपले पारंपरिक खेळ देखील होत होते. त्यातीलच एक खेळ म्हणजे कबड्डी. गणपती काळात येथे कबड्डी स्पर्धा भरवल्या जायच्या. काळाच्या ओघात नाटक बंद झाले. सांस्कृतिक कार्यक्रम कमी झाले. मात्र, या मानाजी राजूजी चाळ गणपती उत्सव मंडळाने आजही आपली कबड्डीची परंपरा कायम ठेवली असून, मंडळाकडून आजही कबड्डी स्पर्धांचे आयोजन केलं जातं.