अमरावती Amravatiwomen Story : क्षुल्लक वादातून रागाच्या भरात 'ती' अवघ्या बारा दिवसाच्या आपल्या बाळाला सोडून घरातून माहेरी जाण्यासाठी बाहेर पडली. यानंतर तब्बल 17 वर्ष स्मृतिभ्रंश झाल्यामुळं औरंगाबाद आणि पुढं अमरावती येथील ख्रिस्ती मिशनरीमध्ये तिनं आपलं आयुष्य घालवलं. इकडं ती आता हयातच नाही म्हणून घरच्यांनी तिचं श्राद्ध घातलं. आता 17 वर्षानंतर मात्र तिला पूर्वीचे सारे काही आठवले. घरच्यांचा शोध घेण्यात आला आणि तिच्या पतीनं चक्क तिच्यासोबत पुन्हा नव्यानं लग्न करुन तिला वाजत गाजत घरी नेलं. एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखी असणारी आगळीवेगळी ही कहाणी 'ईटीव्ही भारत'नं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
चुकीच्या बसमध्ये बसली आणि झाला घोळ : घरात अतिशय क्षुल्लक कारणावरुन वाद झाला आणि अवघ्या बारा दिवसाच्या बाळाला घरी सोडून पैठण तालुक्यातील टाकळी येथील महिला माहेरी जाण्यासाठी एका एसटी बसमध्ये चढली. ती बस तिच्या माहेरी न जाता औरंगाबादला पोहोचली. आपण आपल्या गावी न पोहोचता गजबजलेल्या शहरात आलो हे पाहून ती घाबरली. दोन-चार दिवस औरंगाबाद शहरात ती भटकत राहिली. अशा परिस्थितीत ती हादरली आणि डिप्रेशनमध्ये गेली. तिचा स्मृतिभ्रंशही झाला. 2008 मधली ही संपूर्ण घटना आहे. त्यावेळी औरंगाबाद येथील एका ख्रिस्ती मिशनरीनं तिला आधार दिला. औरंगाबाद येथील ख्रिस्ती मिशनरीच्या इमारतीचं नव्यानं बांधकाम सुरू झाल्यामुळं सात-आठ वर्षांपूर्वी तिला अमरावती येथील होली क्रॉस शाळेच्या परिसरात असणाऱ्या ईशदया मदर टेरेसा मिशनरी होममध्ये (Ish Daya Mother Teresa Missionary) हलविण्यात आलं. या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असताना ती हळूहळू बरी व्हायला लागली.
तिच्या घरच्यांचा असा घेतला शोध: ईशदया मदर टेरेसा मिशनरी होम या ठिकाणी सहा महिन्यापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून सहाय्यक कुलसचिव म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. स्मिता साठे यांची समुपदेशक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी मिशनरीमध्ये असणाऱ्या कवितासोबत सातत्यानं संवाद साधला. त्यावेळी कविता "मी पैठण जवळ असणाऱ्या टाकळी गावची रहिवासी आहे. माझं छोटसं बाळ घरी आहे," असं सांगायची. तुझ्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं असणार अशा परिस्थितीत काय करायचं, असं तिला विचारल्यावर "माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो दुसरे लग्न करूच शकत नाही," असा तिला विश्वास होता. "तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा निर्णय आम्ही घेतला," असं डॉ.स्मिता साठे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं. पैठण जवळ असणाऱ्या एका गावातील सरपंचासोबत चुकून संपर्क साधला गेला. असं असलं तरी त्या सरपंचासोबत बोलताना कविता बाबत माहिती सांगितली. "या प्रकरणात मी नक्कीच मदत करतो," असं त्या सरपंचांनी सांगितलं. "त्या सरपंचानं खरोखर टाकळी गाव गाठून कविताच्या कुटुंबाचा शोध घेतला," असं डॉ स्मिता साठे यांनी सांगितलं.