ठाणे :महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी जबर जखमी झालेले शिवसेनेचे माजी नगरसेवक आज अखेर आपल्या घरी जाणार होते. मात्र, ते टळले. महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गेले १४ दिवस ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. यापैकी फक्त राहुल पाटील आज सायंकाळी तब्बल १४ दिवसांनी आपल्या कुटुंबात परत जाऊ शकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महेश गायकवाडांवर रुग्णालयात 14 दिवस उपचार :महाराष्ट्राच्या उज्वल राजकीय परंपरेला काळिमा फासणारी घटना उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या परवानाधारी पिस्तूलातून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर थेट पोलीस ठाण्यातच बेछूट गोळीबार केला होता. आपल्या पिस्तूलातून तब्बल दहा राऊंड फायर केल्या असता त्यातील सहा गोळ्यांनी महेश गायकवाड यांचा वेध घेतला तर दोन गोळ्या राहुल पाटील यांना लागल्या. त्या दोघांवर गेले १४ दिवस ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. आज अखेर त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झालेली आढळली. त्यांना डिस्चार्ज देण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर तो मागे घेण्यात आला.