चंद्रपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी महायुतीला राज्यात विजय मिळेल असा दावा केली. त्यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे...
- महायुती आहे तरच महाराष्ट्रात प्रगती आहे.
- महाराष्ट्रात महायुतीचं बहुमतातील सरकार येणार.
- महाराष्ट्राच्या विकासाकरता महायुतीनं शानदार संकल्प केले आहेत.
- सभेतील गर्दीच सांगते की महायुती विजयी होणार.
- या सभांच्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
- महायुतीनं महिला, तरुण, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या.
- डबल इंजिन सरकार म्हणजे राज्याचा दुप्पट विकास.
- पुढील पाच वर्षांसाठी विकासाची गॅरंटी.
- सभातील भगव्या गर्दीतून महायुतीचा विजय दिसतोय.
- शंभरहून अधिक रेल्वेस्थानकांचं रूप बदललंय.
- राज्यातील अनेक भागात नवीन रेल्वे प्रकल्प सुरू होत आहेत.
- देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विदेशी गुंतवणूक.
काँग्रेसची राजेशाही मानसिकता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील चिमूर येथे एका सभेला संबोधित करताना, काँग्रेस पक्षावर "राजेशाही मानसिकता" असल्याचा आरोप केला आणि "देशावर राज्य करण्यासाठी जन्माला आले" असाही घणाघात त्यांनी काँग्रेसवर केला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींच्या प्रगतीत अडथळे आणण्याचं कारण ही मानसिकता असल्याचं मोदींनी सांगितलं. "काँग्रेसने या समुदायांना कधीही वाढू दिलं नाही. त्यांना फायदा होईल अशा कोणत्याही हालचालींना त्यांचा विरोध आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले.
आरक्षणविरोधी भूमिका -राजीव गांधींच्या नेतृत्वात 1980 च्या दशकातील एका जाहिरातीचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षण धोरणांना काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विरोध असल्याकडे लक्ष वेधलं. दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींच्या विशेष हक्कांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही जाहिरात अलीकडेच सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ही काँग्रेस पक्षाची दीर्घकाळापासून असलेली आरक्षणविरोधी भूमिका दर्शवते, असा दावा मोदींनी केला.
महाराष्ट्राच्या विकासाची हमी -"येथील मोठ्या प्रमाणात मतदान हे आगामी महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला निर्णायक जनादेश मिळवून देणार असल्याचं स्पष्ट लक्षण आहे," असं मोदी म्हणाले. भाजपाचा निवडणूक जाहीरनामा, संकल्प पत्र हा महाराष्ट्राच्या विकासाची हमी असेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी व्यासपीठावर राज्यातील भाजपा तसंच महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
एक रहेंगे तो सेफ रहेंगे: देशात 10 टक्के आदिवासी समाज राहतो. मात्र या आदिवासी समाजात जातीजातीत झगडा लावण्याचे काम काँग्रेस करत आहे. गोंड समाज विरुद्ध राजगोंड, अरक विरुध्द परधान, पठारी विरुद्ध सरोटी, हलबा विरुद्ध हलबी असा दोन समाजात वाद निर्माण करण्याचं काम काँग्रेस करत आहे. त्यांना समाजात फूट पाडून राज्य करायचं आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आरक्षणाची काही गरज नाही असे सांगत आहेत. त्यामुळं आपल्याला एक राहणं गरजेचं आहे. जर आपण एक नाही राहिलो तर काँग्रेस आपलं आरक्षण घेऊन टाकेल, म्हणून 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.
संविधान काश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नाही : यापूर्वी काश्मीर आतंकवाद आणि अलगाववादाने जळत होता. यात देशाची रक्षा करताना महाराष्ट्रातील अनेक जवान शहीद झाले. काश्मीरमधून कलम 370 हटविले आणि त्यामुळं काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात दुखू लागले. सध्या काश्मीरमध्ये काय होतंय हे आपण सर्व बघत आहोत. 370 पुन्हा लागू करण्यासाठी विधानसभेत पुन्हा हे विधेयक आणले जात आहे. जे पाकिस्तानला हवं आहे तेच काँग्रेस करत आहे. या देशात दोन संविधान होते. बाबासाहेबांनी देशाचे संविधान तयार केलं मात्र काश्मीरमध्ये वेगळे संविधान होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि मुख्यमंत्री देखील याच संविधानाची शपथ घेत होते. तब्बल 70 वर्षे काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान काश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नाही. मात्र आपल्या आशीर्वादाने मी पंतप्रधान झालो आणि कलम 370 ला मी जमिनीत गाडलं.
विकासाला रोखण्यात महाविकास आघाडीची पीएचडी :विकासकामांना रोखण्यात महाविकास आघाडीनं पीएचडी मिळवली आहे. तर काँग्रेस तर यात डबल पीएचडी आहे. या महाविकास आघाडीनं महाराष्ट्रातील अनेक विकासकामात पाय आडवा आणण्याचं काम केलं. मेट्रोपासून तर समृद्धी महामार्गापासून अनेक प्रकल्प विकास योजनांत आडकाठी आणण्याचं काम महाविकास आघाडीनं आपल्या कार्यकाळात केलं. पण आज महायुतीच्या मागच्या अडीच वर्षांच्या काळात कांपा-वरोरा रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. नागपूर-गडचिरोली रेल्वे मार्ग पूर्णत्वास आला आहे. महाराष्ट्राचा गतीनं विकास करणं हे महाविकास आघाडीच्या आवाक्याच्या बाहेर आहे.