मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केलाय, त्यासोबतच बृहन्मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनाही 29 हजार रुपयांचा बोनसही जाहीर केलाय. गेल्या वर्षी जाहीर केलेल्या बोनसच्या रकमेत यंदा 3000 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनाही 5000 रुपयांचा बोनस मिळणार आहे. याआधी राज्य सरकारनं मदरसा शिक्षकांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली होती.
कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण :महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा, यासाठी पालिकेच्या कर्मचारी संघटनांनी पालिका आयुक्तांकडे मागणी केली होती. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील याबाबतचा पत्रव्यवहार केला होता. आदर्श आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सरकारनं पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केल्यानं सध्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आज संध्याकाळ पासून आदर्श आचासंहिता लागू झालीय. याकाळात सरकारला काही घोषणा करायच्या असल्यास सरकारला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार.
मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्यात चर्चा : बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीनं मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
कुणाला किती बोनस?
- महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी - 29,000
- अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी - 29,000
- महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेंच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक - 29,000
- माध्यमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित) - 29,000
- माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित) - 29,000
- अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी - (अनुदानित/विनाअनुदानित) - 29,000
- अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) - 12,000
- सामाजिक आरोग्य स्वयंसेविका - बालवाडी शिक्षिका/मदतनीस - भाऊबीज भेट - 5,000
मदरसा शिक्षकांचं मानधनात वाढ :दरम्यान, यापूर्वी 11 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारनं मदरसा शिक्षकांचं मानधन वाढवण्याची घोषणा केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डी.एड पदवी असलेल्या मदरसा शिक्षकांचं मानधन 6,000 रुपयांवरून 16,000 रुपये आणि बीए, बीएड आणि बीएस्सी पदवी असलेल्या शिक्षकांचं मानधन 8,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा
- 'झिरो टू हिरो'! 1962 साली शून्य जागा जिंकणारा भाजपा आता आहे 'किंगमेकर'
- रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातील निर्णयाबाबत निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा
- किसमे कितना है दम! 288 आमदारांची लिस्ट अन् आकडेवारी, वाचा फक्त एका क्लिकवर