मुंबई-राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेला महायुतीचे विद्यमान अन्यायी सरकार हटवायचे आहे, जनता मतदानाची वाट बघत आहे, त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झालंय, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय. भाजपाने राज्याच्या निवडणुकीत धार्मिक बाबींवर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना जनतेतून प्रतिसाद मिळाला नाही, असे ते म्हणालेत.
केंद्र आणि खोके सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन- केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका उदासीन आहे. सरकारच्या चुकीच्या शेती धोरणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय. सोयाबीन उत्पादकांना पुरेसा दर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड रोष आहे. आम्ही आमचे सरकार आल्यावर सोयाबीन उत्पादकांना 7 हजार रुपये दर देणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय.
रमेश चेन्नीथलांसोबत संवाद (ETV Bharat Reporter) एक होण्यात मोदींचा अडथळा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात धर्म, भाषा यावर भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है याला राज्यातील जनतेने नाकारलंय. तसेच महायुतीच्या नेत्यांनीदेखील नाकारलंय. एक है तो सेफ है म्हणता, मात्र एक होण्यामध्ये मोदींनीच अडथळे निर्माण केले, असा आरोप त्यांनी केलाय.
मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही :मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नसून निवडणुकीच्या निकालानंतर मविआच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत एकत्र बसून सहमतीने निर्णय घेतला जाईल, असे चेन्नीथला यांनी सांगितले.
काँग्रेसने अशोक चव्हाणांना संपवण्याचा प्रयत्न केलाय का? - काँग्रेसने अशोक चव्हाणांना खासदार, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष बनवले. हाच त्यांना संपवण्याचा प्रयत्न होता का, हे त्यांनी सांगण्याची गरज आहे, असे चेन्नीथला म्हणालेत. मात्र पक्षाने त्यांच्यासाठी एवढे केले तरीही चव्हाणांनी गद्दारी केली, असे ते म्हणाले. आम्ही त्यांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यासह विविध पदे दिली, त्यांनी या सर्व पदांचा उपभोग घेतला. मात्र आता ते आमच्यावर त्यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत आहेत. हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. खरे म्हणजे आम्ही त्यांना इतकी महत्त्वाची पदे दिली ते सर्व त्यांना संपवण्याचे प्रयत्न होते, असा उपरोधिक टोला चेन्नीथला यांनी अशोक चव्हाणांना लगावलाय.
हेही वाचा
- ना नेता, ना कोणता पदाधिकारी; एमपीएससीचा विद्यार्थी ट्रम्पेट वाजवत रस्त्यांवर करतोय प्रचार
- महाराष्ट्रात राज्य करतंय चोरीचं सरकार, महायुतीवर राहुल गांधी यांची बोचरी टीका