मुंबई :बहुतांश एक्झिट पोलनं विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक्झिट पोलचे आकडे आणि शक्यता फेटाळल्या आहेत. तसंच राज्यात सत्तापरिवर्तन अटळ असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेसंदर्भात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक गुरुवारी (21 नोव्हेंबर) पार पडली. या बैठकीत सरकार स्थापनेच्या रणनीतीवर तपशीलवार चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
महाविकास आघाडीची ग्रॅंड बैठक, सत्ता स्थापनेसाठी पुढील रणनीती काय? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला (Maharashtra Assembly Election Result) काही तास शिल्लक असतानाच मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय.
Published : Nov 22, 2024, 10:05 AM IST
बैठकीत 'या' मुद्द्यांवर चर्चा : मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख नेते उपस्थित राहील्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी केवळ 48 तास असल्यानं राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचे महाविकास आघाडीसमोर आव्हान असणार आहे. बंडखोर उमेदवारांना पुन्हा पक्षात सामील करून घेणे, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले अंतर्गत मतभेद आणि निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार फुटू नयेत म्हणून आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे आदी मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे बहुमत मिळालं नाही तर काय करायचं? यावरदेखील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जातंय.
संजय राऊतांसह 'हे' नेते होते उपस्थित : सायंकाळी उशिरा बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकाच गाडीतून रवाना झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार चालवत होते. शेजारच्या जागेवर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत बसले होते. तर मागील सीटवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील बसले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही गाडी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी पोहोचली. त्यानंतर या सर्व नेत्यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
हेही वाचा -