महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' प्राचीन मंदिरात शिवाजी महाराजांनी घेतलं होतं दर्शन, महाशिवरात्रीला रंगतो 'शिव पार्वती विवाह सोहळा' - MAHASHIVRATRI 2025

देशात उज्जैन, त्र्यंबकेश्वर आणि भावसिंगपुरा या तीन ठिकाणी प्रामुख्यानं शिव पार्वतीचं समोरासमोर मंदिर आहे असं मानलं जातं. यातील एका मंदिरात शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं होतं.

Mahashivratri 2025
शिव पार्वतीचं प्राचीन मंदिर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2025, 5:50 PM IST

छत्रपती संभाजीनगर : महादेवाची अनेक प्राचीन मंदिरं देशात विविध ठिकाणी पाहायला मिळतात, असंच एक मंदिर शहरातील भावसिंगपुरा येथे आहे. "सत्येश्वर शिव पार्वती मंदिर" प्राचीन कलाकृतीचं उत्तम उदाहरण मानलं जातं. विशेष म्हणजे मुघलांच्या नजरेत येऊ नये यासाठी या मंदिराला कळस बांधण्यात आला नव्हता. जमिनीपासून साधारणतः वीस फूट खाली असलेल्या बारव जवळ हे प्राचीन मंदिर आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात येऊन गेल्याची नोंद आहे. महाशिवरात्रीला (Mahashivratri) येथे अनोखा विवाह सोहळा (Shiva Parvati Marriage) रंगतो, त्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित राहतात.



प्राचीन मंदिराचा उत्तम नमुना : सत्येश्वर शिव पार्वती मंदिराची स्थापना सुमारे इ.स. 1600 च्या सुमारास मुघल सरदार भावसिंग यांनी केली होती. त्यांच्या नावावरून या परिसराला भावसिंगपुरा असं नाव देण्यात आलं. शिव आणि पार्वती मंदिरे एकमेकांच्या समोर आहेत हे इथलं वैशिष्ट्य. उज्जैन, त्र्यंबकेश्वर आणि भावसिंगपुरा या ठिकाणी अशा पद्धतीची मंदिरे एकमेकांसमोर आहेत. हे मंदिर सर्वात प्राचीन आणि धार्मिक मानलं जातं. म्हणूनच देशभरातून भाविक या मंदिराला भेट देतात. भावसिंगपुरा येथील हे मंदिरे 20 फूट खोल बरवमध्ये (विहीरी) आहे. तर दर्शन घेण्यासाठी भाविकांना सुमारे 25 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. भावसिंग, जयसिंग आणि पहाडसिंग हे तीन भाऊ निजामाच्या सैन्यात सरदार होते. ते छत्रपती संभाजीनगर येथे तैनात होते, ज्याला पूर्वी औरंगाबाद म्हटलं जात असे. भावसिंग यांनी येथे बारव आणि शिव-पार्वती मंदिराची स्थापना केल्याची माहिती साहेबराव लोखंडे यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना विश्वस्त साहेबराव लोखंडे (ETV Bharat Reporter)



मंदिरात रंगतो विवाह सोहळा : शिव आणि पार्वती शिक्तीचं स्वरूप मानलं जातं. देशात अनेक ठिकाणी भगवान शिवशंकराची मंदिरं आढळून येतात. मात्र, माता पार्वती आणि महादेवाचे एकत्र असलेले मंदिर देशात खूपच कमी ठिकाणी पाहायला मिळते. त्यातही एक म्हणजे भावसिंगपुरा येथील हे "सत्येश्वर मंदिर". एका बाजूला महादेवाचे तर अगदी विरोधी दिशेला समोरच माता पार्वतीचं मंदिर आहे. महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं की मागे वळताच माता पार्वतीचं दर्शन होईल अशी रचना मंदिराची आहे. या मंदिरात महाशिवरात्रीच्या रात्री बारा वाजता शिव पार्वतीचा अनोखा विवाह सोहळा रंगतो. त्याआधी शिव पार्वतीचा शृंगार करून अगदी पारंपरिक पद्धतीनं हा विवाह केला जातो. मंत्र उच्चार केल्यावर परिसरात वेगळे चैतन्य अनुभवायला मिळते, त्यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याची माहिती साहेबराव लोखंडे यांनी दिली.



मंदिराला नाही कळस :मोगल राजवटीत महाराष्ट्रातील अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रं नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. रस्त्यात येणारे प्रत्येक मंदिर आणि त्यातील देवी देवतांची विटंबना केली जात होती. त्यामुळं त्यावेळी मंदिर मोगलांच्या दृष्टीस पडू नये याकरता कळस उभारण्यात आला नाही. जमिनीपासून वीस फूट खोलवर असलेल्या बारवमध्ये हे मंदिर आहे. अगदी जवळ जाईपर्यंत तिथे धार्मिक स्थळ आहे याची जाणीव देखील कोणाला होणार नाही अशा पद्धतीनं ते निर्माण केलं आहे. महादेवाची पिंड पूर्वेला आहे तर पार्वती मंदिर पश्चिमेला आहे. बारवमध्ये प्रवेश केल्यास पाणी आजही दिसते, तर बारवच्या उत्तरेला हनुमानाची एक छोटी मूर्ती विराजमान आहे. जुन्या दगडांमध्ये बांधलेल्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंचवीस पायऱ्या उतरून जावं लागतं अशी माहिती, लोखंडे यांनी दिली.



शिवाजी महाराजांनी घेतलं होतं दर्शन : इतिहासात औरंगजेब आणि छ. शिवाजी महाराज यांच्या अनेक आठवणी सामावलेल्या आहेत. दख्खनमध्ये असलेल्या देवगिरी किल्ल्यावर औरंगजेबाचे राज्य असताना ते जिंकण्यासाठी छ. शिवाजी महाराज या परिसरात आले होते. त्यावेळी याच मंदिरात महाराजांनी दर्शन घेत बाजूलाच आपली छावणी उभारली होती. आजही त्या परिसरात आठवणी आहेत अशी माहिती लोखंडे यांनी दिली.



नवसाला पावणारे शिव पर्वती: शिव-पर्वती मंदिर अतिशय प्राचीन आहे. येथे मोठ्या श्रद्धेने भाविक दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री आणि श्रावणात राज्यभरातून भाविक दाखल होतात. नवसाला पावणारे मंदिर अशी ख्याती सर्वत्र पसरलेली आहे. दर वर्षी मोठ्या भक्ती भावाने भाविक दर्शनासाठी येत असतात. शिव-पर्वती मंदिरात आल्यावर मनाला वेगळीच शांतता लाभत असल्याचा अनुभव भक्त आतिष वानखेडे यांनी सांगितला.


हेही वाचा -

काय आहे महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त?; पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘या’ पाच गोष्टी दान करा

ABOUT THE AUTHOR

...view details