छत्रपती संभाजीनगर Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या निमित्त सर्वच शिवमंदिरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. महत्वाचं मानलं जाणाऱ्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासून अलोट गर्दी पाहायला मिळाली. हर हर महादेवाचा जयोघोष करत भाविकांनी भक्तिभावानं दर्शन घेतलं. काही भाविक या दिवशी आपला पूर्ण झालेला नवस फेडण्यासाठी येत असतात. भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. अवजड वाहनांची रहदारी पुढील चार दिवसांसाठी बंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलीय.
मध्यरात्रीपासून शिवभक्तांची गर्दी : महाशिवरात्रीच्या दिवशी महिला विशेष शिवज्योत घेऊन जात असतात. भव्य मिरवणूक काढून घृष्णेश्वर मंदिरातून चार वाजता हा दीप घेऊन पालखी शिव कुंडावर जाते. तिथं अभिषेक झाल्यावर पुन्हा ती ज्योत मंदिरात स्थापित केली जाते. महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी मंदिर परिसरात दाखल होतात. मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात. रात्री बारा वाजता भगवान शंकराची आरती करुन भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येते. दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता शासकीय पूजा आणि आरती केली जाते. त्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडं ठेवलं जातं. स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, याकरिता त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करुन दिली जाते. बाहेरुन येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था, उपवास असल्यानं पाणी आणि फराळाची सोय केली जाते. तर वाहनांना मंदिर परिसरात येण्यास मनाई असून त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात येतात.
नवसाला पावणारं देवस्थान :भगवान शंकराचे देशभरात 12 ज्योतिर्लिंग असून त्यात प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे वेगवेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळते. सर्व मंदिराची परिक्रमा पूर्ण करताना शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. पहिले अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत. तर घृष्णेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारे घृष्णेश्वर भगवान असं मानलं जातं. त्यामुळं महाशिवरात्रीला अनेक भाविक आपला नवस फेडण्यासाठी येतात. कोणी महाप्रसाद तर कोणी फळं वाटून आपला नवस पूर्ण करतात. देशभरात बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेत नाही, तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही अशी श्रद्धा आहे. त्यामुळं देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भक्त हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येत असतो. तर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या संख्येनं भक्त दरवर्षी घृष्णेश्वर मंदिरात दाखल होतात. आपली मनोकामना मागून भगवान शंकराचा जयघोष करत असतात.