गुहेतील शिवलिंगाविषयी माहिती देताना भाविक अमरावती Mahashivratri 2024:येथे पांढऱ्या मातीचा मोठा पहाड अर्थात गढीच्या आत असणाऱ्या गुहेमध्ये शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या निमित्त अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत. या गुहेतून जाताना मधात नदीच्या पाण्याच्या झऱ्यामुळे कुंडात पाणी साचले आहे. पाण्याच्या ह्या कुंडात भिजल्यावरच समोर गुफेमध्ये शिवलिंगाचे दर्शन होते. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर अरुणेश्वर नावानं हे ठिकाण आहे.
शिवलिंग पांडवकालीन असल्याचा विश्वास :चांदूरबाजार तालुक्यात निंभोरा या गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीमध्ये 35 ते 40 वर्षांपूर्वी हरिहर महाराज नावाच्या व्यक्तीला या ठिकाणाहून 27 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वालम तीर्थ या वाल्मिकी ऋषीचं स्थान मानल्या जाणाऱ्या ठिकाणी नदीत एक मोठा दगड सापडला होता. या दगडावर शिवलिंग होतं. शिवलिंग असलेला हा दगड हरिहर महाराज यांनी नदीच्या पात्रातून बाहेर आणला. त्यानंतर शिवलिंगाव्यतिरिक्त असणारा दगडाचा भाग त्यांनी तोडला आणि दगडाच्या काही भागावर बारा ज्योतिर्लिंग तयार केलेत. त्यानंतर या शिवलिंगाची स्थापना या गढीच्या आतमध्ये असणाऱ्या गुहेतील शेवटच्या टोकावर घुमट सारख्या असणाऱ्या ठिकाणी केली. अरुणेश्वर नावाने या शिवलिंगाची पूजा गत अनेक वर्षांपासून परिसरातील ग्रामस्थ करीत असल्याची माहिती हरिहर महाराजांचे शिष्य असणारे ललित महाराज यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
अशी आहे गुफा :निंभोरा गावालगत मातीच्या भल्यामोठ्या गढीखाली अनेक वर्षांपासून गुहा आहे. मधल्या काळात काही ठिकाणी ही गुफा पुजली होती. या परिसरात फार पूर्वी असणाऱ्या पगलानंद महाराजांचे शिष्य असणाऱ्या हरिहर महाराज यांनी गढीच्या खाली दबलेली ही गुहा खोदली. ज्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाण्याकरिता एकूण तीन मार्ग असल्याचं खोदकामा दरम्यान लक्षात आलं. खोदकामा दरम्यानच या गुफेत एका ठिकाणी पूर्णा नदीच्या पाण्याचा मोठा झरा आढळून आला. ज्या ठिकाणी हा झरा आहे त्या ठिकाणी खाली उतरण्यासाठी आणि वर चढण्यासाठी पायऱ्या देखील आढळून आल्यात, असे ललित महाराज यांनी सांगितले. पूर्णा नदीचा झरा असणाऱ्या ठिकाणी शासनाकडून पाणी रोज मोटर पंपद्वारे बाहेर देखील काढण्यात येत असल्याचं ललित महाराज म्हणाले.
महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात होते गर्दी :पूर्णा नदीत सापडलेल्या शिवलिंगाप्रमाणेच या गढीमधील गुहा ही पुरातन असल्याचं निंभोरा परिसरातील रहिवासी सांगतात. अनेक वर्षांपासून महाशिवरात्रीच्या प्रवाहावर चांदूरबाजार तालुक्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात देखील या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळते. आता महाशिवरात्रीच्या पर्वावर या ठिकाणाला यात्रेचं स्वरूप आलं आहे.
रिल्समुळे चर्चा :चांदूर बाजार शहरासह लगतच्या परिसरातील काही युवक या भागात फिरायला आले असताना त्यांना गुहेच्या आतमधील शिवलिंगाच्या दर्शनासाठी पाण्यात ओलं होऊन जावं लागलं. याबाबत लक्षात येताच अनेकांनी या गुहेच्या आतमधल्या रिल्स काढून सोशल मीडियावर वायरल केल्यात. यामुळेच दीड दोन वर्षांत या ठिकाणाची माहिती सर्व दूर पसरली. आमच्या तालुक्यातील अरुणेश्वराच्या दर्शनासाठी वर्ष दीड वर्षांपासून भाविकांची गर्दी होत असली तरी हे ठिकाण अतिशय जुने आहे. गढी मधील गुहा देखील पुरातन असल्याचं चांदूरबाजार तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी गोपाल तिरमारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हरिहर महाराजांचे वास्तव्य :ज्या ठिकाणी गढीमध्ये गुहा आहे त्या परिसरात गत पन्नास वर्षांपासून हरिहर महाराजांचे वास्तव्य आहे. गढीच्या आतमध्ये असणारी ही गुहा काही ठिकाणी बुजली असताना हरिहर महाराज यांनी स्वतः ती खोदून काढली. योगायोगाने या घडीच्या बाजूलाच वाहणाऱ्या पूर्णा नदीमध्ये त्यांना शिवलिंग असणारा मोठा दगड सापडला. या दगडावरील शिवलिंगाला योग्य आकार देऊन गुहेमध्ये शिवलिंग स्थापन करण्यात आले. ज्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे ते ठिकाण जमिनीच्या आतमध्ये अतिशय थंडगार आहे. या गुहे लगतच एका झोपडीमध्ये हरिहर महाराज यांचे वास्तव्य आहे. गुहेतील या अरुणेश्वराच्या सेवेसाठी चांदूरबाजार तालुक्यातील अनेक भाविक या ठिकाणी नियमित येतात.
हेही वाचा:
- भाजपाची राज्यात 35 जागांवर लढण्याची तयारी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला 'इतक्या' जागा?
- मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
- शिवसेना आमदार अपात्र प्रकरण : ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी