मुंबई Maharashtra Weather Update :मुंबईत पावसानं उकड्यापासून नागरिकांना दिलासा दिला असला तरी अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांच्या अडचणीत वाढ झालीय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात किनारी भागात अनुकूल परिस्थितीमुळं मान्सून रविवारी मुंबईत नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी पोहोचलाय. मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक भागात पाणी साचलंय. मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून, गेल्या 24 तासांत शहरातील अनेक भागात 150 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालीय.
मुंबईत वादळाची शक्यता : मुसळधार पावसामुळं भायखळा, सायन, दादर, माझगाव, कुर्ला, विक्रोळी आणि अंधेरी यांसारख्या अनेक भागात पाणी साचलं होतं. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आणि वाहतूक कोंडी झाली होती. यासोबतच मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसासह वादळाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईतील वातावरण थंड झालंय. पालिकेच्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअस होतं. तर दिवसा 78% आणि रात्री 94% आर्द्रतेची पातळी नोंदवली गेली.