मुंबई/अमरावती- Maharashtra Weather Update :गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सूननं राज्यासह विदर्भापर्यंत मजल मारली असल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आलीय. मात्र, विदर्भात अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यानं नांगरणी करून तयार असलेला शेतकरी पेरणीच्या कामांसाठी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तर दुसरीकडं, पुढील 24 तासांसाठी भारतीय हवामान विभागानं मुंबई, कोकणासह विदर्भाला मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय.
श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.अनिल बंड (Source reporter)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 25 जूनपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच येत्या 3 ते 4 दिवसांत राज्याच्या उर्वरित भागातही मुसळधार पाऊस होऊ शकतो. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर याशिवाय पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशाराही देण्यात आलाय. सोबतच पुढील 48 तासांत मान्सून संपूर्ण राज्यात सक्रिय होईल असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळं काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिवमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडं उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबईसह कोकण विभागातील काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या 64.5 ते 115.5 मिमी ते अति जोरदार स्वरूपाच्या 115.5 ते 204.4 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 21-23 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भातील अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा :विदर्भात मान्सून दाखल झाला असला तरी अद्यापही काही भागात जूनचा पंधरवडा उलटूनही पाऊस झालेला नाही. तर असं असतानाच आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात सर्वत्र चांगला पाऊस पडणार, असा अंदाज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अनिल बंड यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केलाय. तसंच मान्सूनमध्ये काहीशी सुधारणा होण्याची लक्षणं दिसताय. मात्र, या महिन्यात मोठ्या किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता कमीच आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्र किनारपट्टीवर आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर चक्राकार वारं वाहतंय. या हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळं विदर्भात पुढील पाच दिवस पाऊस हा हलका ते मध्यम आणि विखुरलेला असू शकतो, असंही बंड यांनी सांगितलं.
असा आहे धरणांमध्ये जलसाठा :अमरावती विभागात एकूण नऊ मोठ्या धरणांमध्ये 476 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 34.5 टक्के पाणी आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात 45.81% पाणीसाठा तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 16.57 टक्के पाणी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाहन प्रकल्पात 32.3 टक्के पाणीसाठा आहे. या मोठ्या प्रकल्पाव्यतिरिक्त विभागातील मध्यम प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील पंढरी प्रकल्पात 19.97 टक्के, बोर्डीनाल्या प्रकल्पात 1.10 टक्के यवतमाळ जिल्ह्यातील बोरगाव प्रकल्पात 21.94 टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा प्रकल्पात 10 टक्के, वाशिम जिल्ह्यातील एलबुरजी प्रकल्पात 11.96 टक्के आणि बुलढाणा जिल्ह्यातील कोराडी प्रकल्पात 17.19 टक्के, तोरणा प्रकल्पात 5.96 टक्केपाणी पाणी आहे. यावर्षी विदर्भात पावसाला उशीर होत असला तरी सर्वत्र अतिशय चांगला पाऊस बरसणार आहे. अमरावती विभागातील सर्वच प्रकल्पांमध्ये तुडुंब पाणीसाठा राहील, असंदेखील अनिल बंड म्हणाले.
हेही वाचा -
- मराठवाडासह कोकण विभागाला हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; पेरणीच्या कामांसाठी बळीराजाला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा - Maharashtra Weather Forecast
- रिमझिम पावसानं 'मिनी काश्मीर'चं सौंदर्य खुललं, महाबळेश्वरात पावसाळी पर्यटन हंगाम सुरू - Maharashtra Hill Stations
- नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं 6 जणांचा मृत्यू, 1500 घरांची पडझड - Nashik Unseasonal Rain