नुंबई Heavy Rain In Mumbai And Sataraमुंबईत आजदेखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी मुंबईतील काही भागात २०० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. सोबतच पुढील २४ तासात शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाच्या मुंबईतील कुलाबा प्रादेशिक केंद्रानं नमूद केलं आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी (२३ जुलै) सकाळी १० वाजता पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबईतील कुलाबा प्रादेशिक केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसह मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, विदर्भात देखील काही ठिकाणी तुरळक तर, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं वर्तवली आहे.
विदर्भालादेखील यलो अलर्ट जारी-हवामान विभागानं आज मुंबईसह धुळे, ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सोबतच कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं मुंबईसाठी २६ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी आहे. विदर्भात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि भंडारा, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, गोंदिया किंवा चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे विदर्भालादेखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद-बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, शहरात मागील २४ तासात अनेक ठिकाणी २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस आणि उंच लाटांचा अंदाज असल्यानं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF च्या तीन तुकड्या शहरात तैनात करण्यात आल्या असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.
- सातारा जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट:सातारा जिल्ह्याला हवामान विभागानं आज आणि उद्या रेड अलर्ट दिला आहे. पश्चिम घाट क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाजही वर्तवला आहे. त्यामुळं कोयना नदीला पूर येण्याची शक्यता आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.