महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल..." - उद्योगमंत्री उदय सामंत - Maharashtra Udyog Bharari - MAHARASHTRA UDYOG BHARARI

Uday Samant On Maharashtra Udyog Bharari : विदेशातील उद्योजकांना जर राज्यात निमंत्रित करायचं असेल, तर त्यासाठी औद्योगिक क्षेत्राला अत्यावश्यक असणारी पायाभूत सेवा सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता याला प्राधान्य दिलं. या प्रयत्नांमुळं राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळाल्याचं उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितलं.

Maharashtra Udyog Bharari
उद्योगमंत्री उदय सामंत (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 9:31 PM IST

नागपूर Uday Samant On Maharashtra Udyog Bharari : महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध राहून आजपर्यंत ज्या भागात उद्योगाची चाके रुजली नव्हती, अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राला संपूर्ण भारतात अव्वल स्थानावर आणण्यासाठी गेल्या दोन वर्षांत केलेल्या प्रयत्नांना यश आलं असून जागतिक गुंतवणूकदारांचं लक्ष आता महाराष्ट्राकडे वेधून घेतलं. नक्षलग्रस्त भागांच्या विकासामुळं गडचिरोली जिल्ह्याचं स्वरूप आता पूर्णपणे बदललं आहे. नक्षलवादी जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख पुसून टाकण्यात सरकारला यश आल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. नागपुरात आयोजित 'महाराष्ट्राची औद्योगिक भरारी' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात बोलताना उदय सामंत म्हणाले, "एमआयडीसीनं उद्योजकांना केवळ जागा उपलब्ध करून देणं या उद्देशापर्यंतच सीमित असलेल्या महामंडळाचं स्वरूप आता बदललं आहे. चांगले उद्योजक, विदेशी गुंतवणूकदार, परदेशातील उद्योजकांना राज्यात आमंत्रित करायचं असेल तर औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची शाश्वतता जपणं याला आम्ही प्राधान्य दिलं. या प्रयत्नांमुळं राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळाली."

विदर्भासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद :विदर्भातील औद्योगिक क्षेत्राच्या पायाभूत सुविधांकडे आम्ही प्राधान्यानं लक्ष दिलं. पूर्व विदर्भासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. रस्ते, वीज, मलनिस्सारण ​​व्यवस्था, पोलीस ठाणे या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला. उद्योजकांसह कामगारांनाही सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

29 हजार 927 रोजगार निर्मिती झाली :"विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना औद्योगिक क्षेत्राशी जोडण्यासाठी अमरावती येथं पीएम टेक्सटाइल पार्क उभारण्यात येत आहे. यातून सुमारे 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्राला वेगळी दिशा देण्याचं काम सरकार करत आहे. नागपूर विभागात 1 हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं वाटप करून 42 हजार 937.43 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळं 29 हजार 927 नोकऱ्या निर्माण झाल्या. औद्योगिक विकासाला चालना देऊन 80 हजार रोजगार निर्माण झाले. मुख्यमंत्र्यांच्या रोजगार निर्मिती उपक्रमातून 35 हजार लोकांना रोजगार मिळाला. हे उद्योग विभागाचं यश आहे. विदर्भातून कोणताही प्रकल्प स्थलांतरित होत नसून उलट परकीय गुंतवणूक वाढत आहे," असं उदय सामंत स्पष्ट केलं.

लाडक्या बहिणींचा प्रातिनिधीक गौरव :'महाराष्ट्राची औद्योगिक भरारी' या विशेष कार्यक्रमात लाडक्या बहिणींचा गौरव करण्यात आला. हा गौरव योजनांसाठी नसून राज्याच्या औद्योगिक धोरणामध्ये, राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये त्यांनाही प्राधान्य मिळावं, हक्काची जागा मिळावी, उद्योजक म्हणून त्यांनाही आपली ओळख निर्माण करता यावी, यासाठी विदर्भात महिलांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक 75 हजार कोटी :गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक 75 हजार कोटींवर पोहोचली असून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील तरुणांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्रांमध्ये स्थानिक पातळीवरील उद्योजकांनी पुढे येऊन सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

हेही वाचा

  1. आरोग्य खात्याचा 3 हजार 200 कोटींचा महाघोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा सनसनाटी आरोप - Vijay Wadettiwar Allegation
  2. राज्यात मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर; मात्र मुलांचं लक्ष वेगळीकडेच, अजितदादांचं मिश्कील वक्तव्य - Ajit Pawar Speech
  3. मंत्रालयात तोडफोड करणारी महिला मानसिक रुग्ण; पोलिसांची माहिती - Devendra Fadnavis Office Attack

ABOUT THE AUTHOR

...view details