जालना Maratha Reservation :मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. 10 टक्के आरक्षण द्या, ही आमची मूळ मागणी नाहीच. सगेसोयरेबाबत का बोलत नाहीत. त्यामुळे सरकारनं आमची फसवणूक केली असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे : "आमची फसवणूक करायची होती तर अधिवेशन का घेतलं? या आरक्षणामुळे सर्वांना फायदा होणार नसेल तर अधिवेशन कशाला घेतलं?"असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विचारला आहे. आमच्यावर हे आरक्षण का थोपवता? सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे. कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सगेसोयरेच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीनं करा : मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं. मात्र सरकार विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा का करत नाही? सरकारनं सगेसोयरेच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीनं करावी. नाहीतर आम्ही उद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू करू, असा निर्वणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सरकारनं फसवणूक केली : "सरकारनं आमची फसवणूक केली. आम्हाला सांगितलं गेलं एक आणि ऐनवेळी दुसरंच ताट समोर केलं जातंय. हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. सरकार आणखी किती दिवस मराठा समाजाची फसवणूक करणार? तुम्ही अधिसूचना काढली, मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप नाही. तर मग अधिसूचना काढलीच कशाला?" असा खडा सवाल त्यांनी केला आहे.
हे वाचलंत का :
- Special Session Live Updates : मराठ्यांसाठी 10 टक्के आरक्षणाची तरतूद; 'सगेसोयरे'वरच मनोज जरांगे पाटील ठाम
- "सरकार विशेष अधिवेशन बोलावून वेळकाढूपणा करतंय", विरोधकांची सडकून टीका