मुंबई Resident Doctors Strike : राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे. आपल्या विविध मागण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टर आज सायंकाळी पाच वाजल्यापासून संपावर जाणार आहेत. या निवासी डॉक्टरांच्या संपामुळं राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेमध्ये बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळं आता निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाचं शस्त्र उगारलं आहे.
आपत्कालीन सेवा सुरूच: आज राज्यभरातील निवासी डॉक्टर जरी संपावर जाणार असले तरी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरूच राहणार असल्याचं मार्ड संघटनेनं सांगितलंय. तसेच तीन महिन्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि मार्ड पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. ज्या डॉक्टरांच्या मागण्या आहेत त्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी समजून घेतल्या. मागण्या मान्य केल्या, मात्र तीन महिने उलटून त्यातील एकही मागणी पूर्ण झाली नाही. तसेच मंगळवारी देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि मार्ड पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. मात्र चर्चा निष्फळ ठरल्यामुळं आजपासून निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचं मार्डनं म्हटलं आहे.
काय आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्या?
- निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ व्हावी
- निवासी डॉक्टरांचे वेतन प्रत्येक महिन्याच्य १० तारखेच्या आत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावं
- निवासी डॉक्टरांची चांगल्या पद्धतीने हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी
- वेतन हे केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या वेतनाप्रमाणं देण्यात यावं
आजच्या बैठकीतून तोडगा निघणार...? : आजपासून निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्यामुळं त्याचा वैद्यकीय सेवांवर परिणाम होणार आहे. त्यामुळं आज वैद्यकीय शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि निवासी डॉक्टर यांच्यात मंत्रालय येथे दुपारी बैठक होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वी निवासी डॉक्टरांनी हा संप मागे घ्यावा, अशी मी त्यांना विनंती करतो असं वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी म्हटलंय. डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करावी, यासाठी भाड्याने इमारती घेण्याच्या सूचना मी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखांना दिल्या आहेत, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. पंरतु आजच्या बैठकीतून मार्ग निघतोय का, हे पाहवं लागणार आहे.
हेही वाचा -
- जे जे रुग्णालयातील डॉक्टर महेंद्र कुरा यांची बदली; डॉक्टरांनी घेतला संप मागे
- जे जे रुग्णालयातील 900 डॉक्टर जाणार संपावर; नेमकं कारण काय?
- Resident Doctors Strike : निवासी डॉक्टरांचा संप; रूग्णसेवेवर कमी अधिक प्रमाणात परिणाम...