मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर, आज शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी दावा केला की, विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) एकूण 288 पैकी 160 ते 165 जागा जिंकेल आणि राज्यात स्थिर सरकार येईल. खासदार असलेल्या संजय राऊत यांनी असंही सांगितले की, शनिवारी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी महाविकास आघाडीचे नेते गुरुवारी म्हणजेच आज भेटतील. या बैठकीत पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात येईल.
यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं, "आम्ही आणि आमचे मित्र पक्ष, शेकाप, समाजवादी पार्टी, डावे पक्ष यासारख्या छोट्या पक्षांसह बहुमताचा आकडा ओलांडत आहोत. आम्ही 160-165 जागा जिंकत आहोत." राज्यात आमचं एक स्थिर सरकार असेल. मी हे अगदी आत्मविश्वासानं सांगू शकतो, असंही संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं.
काल मतदान संपल्यानंतर, बहुतांश एक्झिट पोलने महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे तर काहींनी महाराष्ट्रात MVA अर्थात महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करता येईल असं म्हटलं आहे.