मुंबई Nitesh Rane :मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे हे मराठ्यांचे नेते नाही तर ते मुस्लिमांचे नेते आहेत, त्यांच्या आंदोलनामुळे मराठ्यांना कमी आणि मुस्लिमांना अधिक फायदा झाला. ते नवे मोहम्मद अली जीना आहेत, अशी जहरी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज मुंबईत केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली.
आमदार नितेश राणे यांचा जरांगेवर प्रहार (ETV Bharat Reporter) भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी आज मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट जहरी प्रहार केला आहे. माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला काही फायदा झालेला नाही. त्यांच्या आंदोलनाचा फायदा झालेला मराठा तरुण मला दाखवा. जेव्हा नारायण राणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत होते. तेव्हा मनोज जरांगे गोधडीत होते. जरांगे आमच्या कार्यालयात स्वतःवरील केसेस काढून घेण्याची विनंती करण्यासाठी येत होते, असा टोलाही राणी यांनी लगावला.
हे तर नवे मोहम्मद अली जिना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठ्यांना कोणताही फायदा झाला नाही उलट या आंदोलनामुळे मुस्लिम समाजालाच अधिक फायदा झाला असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला. मनोज जरांगे पाटील हे वापरत असलेली गाडी मराठा समाजाची आहे की, एखाद्या मोहम्मद अली जिना यांच्या कंपूतील माणसाची आहे, हे सुद्धा तपासलं पाहिजे. तसंच मनोज जरांगे पाटील हे नवे मोहम्मद अली जिना आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
अंधारे यांचा पलटवार : या संदर्भात शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी, "हे अत्यंत गंभीर असं वक्तव्य आहे. अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला जातिवाचक टिप्पणी करणं आणि एखाद्या समुदायाबद्दल तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही. नितेश राणे हे नेहमीच अशा पद्धतीचे वक्तव्य करतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्यांना तोंड उघडू नका, असं सांगण्याची वेळ आली आहे," असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
वक्तव्य चुकीचं मात्र आंदोलनाचा अहंकार नको :विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता, भाजपा आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, "नितेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, असं करताना त्यांनी केलेलं वक्तव्य योग्य नाही. त्यामुळे सर्वच नेत्यांनी जपून बोललं पाहिजे. मात्र, आंदोलनकर्त्यांनीही आंदोलनाचा अहंकार बाळगू नये. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं सरकारनं नेहमीच स्वागत केलं आहे. मराठा समाजासाठी सरकारनं नेहमीच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच आम्ही दहा टक्के आरक्षण सुद्धा दिलं आहे," असंही दरेकर म्हणाले.
हेही वाचा
- राज्यात बुल्डोझर बाबांचा हवा पॅटर्न : नितेश राणे यांनी उत्तरप्रदेशप्रमाणं महाराष्ट्रातही धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची मागणी - Nitesh Rane On Anti Conversion Law
- दिशा सालियन मृत्यूप्रकरणी 31 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी, आमदार नितेश राणे राहणार हजर - Disha Salian Death Case