अमरावती Bachchu Kadu Vs Ravi Rana :जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार बच्चू कडू तसंच आमदार रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. बंद पडलेल्या फिनले मिलबाबत आमदार राणा यांनी काढलेल्या विषयामुळं आमदार बच्चू कडू भडकले. यावेळी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकात पाटीलदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर कडू यांनी बडनेरा मतदारसंघातील मिलप्रकणी राणा दाम्पत्यावरही टीका केली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच बंद पडलेल्या मिलच्या प्रश्नामुळं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या ठिकाणी अनेक वर्षांपासून फिनले मिल बंद पडली होती. प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्यावर 2008 मध्ये मिल सुरू झाली. मात्र 2019 पासून मिल बंद पडली आहे. अचलपूरचे आमदार म्हणून बच्चू कडू यांनी मिल सुरू करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत - रवी राणा, आमदार
राणा म्हणाले आमचे प्रयत्न : "अनेकांना रोजगार देणारी वस्त्रोद्योग क्षेत्रातील अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाची असणारी फिनले मिल 2019 पासून बंद आहे. ही मिल सुरू करण्यासाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. तसंच मीदेखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिल सुरू करण्यासंदर्भात अनेक बैठकी घेतल्या आहेत. आता चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिनले मिल संदर्भात मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कामगारांचे थकीत वीस कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं बंद असणारी पुन्हा मिल सुरू करून बेरोजगार झालेल्या हजारो युवकांना आता रोजगार दिला जाणार आहे. या संदर्भात राज्य सरकारनं केंद्र शासनाला पत्र देखील पाठवलंय," असं आमदार रवी राणा यांनी म्हटलंय.