महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टीका करताना नेत्यांनी सोडली पातळी, एकमेकांवर हल्ला करताना का ठेवलं जात नाही भान ? - Low Level Language In Maharashtra

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सध्या राजकारणी एकमेकांची उणीदुणी काढताना अत्यंत खालच्या भाषेचा वापर करत आहेत. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खालच्या पातळीवर राजकीय नेते टीका करत असल्यानं राजकारणाचा स्तर घसरल्याची भावना नागरिक बोलून दाखवत आहेत.

Maharashtra Politics
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 7:47 AM IST

मुंबई Maharashtra Politics : सध्या महाराष्ट्रातील राजकारण कमालीचं गढूळ आणि दूषित झालं आहे. मतदारांच्या जीवावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी अर्वाच्य आणि खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करताना पाहयला मिळत आहेत. परिणामी राजकीय नेत्यांवरील विश्वासार्हता हळूहळू लोप पावत असून राजकारणाचा चिखल झालाय अशी भावना जनतेची आहे. यामुळं मतदार पुढच्या वेळेला मतदान करायला बाहेर पडतील का?, याबाबत शंका वर्तवली जात आहे. सध्या नेत्यांची भाषा पाहता, ऐकता राजकारणात नवोदित येण्यास धजावतील का? हा एक गंभीर प्रश्न असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

नेत्यांकडून कोणत्या भाषेचा वापर :मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्रास पक्षातील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप आणि टीका करताना मोठ्या प्रमाणात शिव्यांचा वापर केला आहे. जे शब्द नेत्यांच्या तोंडात शोभत नाहीत, असे शब्द महाराष्ट्रानं ऐकले. पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात असे शब्द कधी ऐकायला मिळाले नाहीत. परंतू सध्या अत्यंत खालच्या भाषेचा वापर होत आहे. भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. "शरद पवारांच्या निष्ठावंत कुXXनं जास्त भुंX नये, नाहीतर नसबंदी करावी लागेल", असं म्हणत त्यांच्या वैयक्तिक विचारसरणीचं दर्शन घडविलं. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना "कलंक, फडतूस, निर्ढावलेला, निर्घृण.. निर्दयी, मनोरुग्ण आणि लांडग्यासारखा गृहमंत्री" अशी बोचरी टीका केली.

जशाच तसं उत्तर :नितेश राणेंना संजय राऊत यांनी प्रतिउत्तर देताना तुम्हीच कुX आहात, असं जशाच तसं उत्तर दिलं. तर उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धवजी यांचेच मानसिक संतुलन बिघडलं आहे... त्यांनी लवकर बरे व्हावे... गेट वेल सून... " असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. शिंदे गट, ठाकरे गट, राणे कुटुंबीय, भाजपा, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षातील नेत्यांनी बोलताना मर्यांदा ओलांडली आहे. त्यामुळं गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नाग, पोपट, माकड, कुX, भाडX, नाXXक, कलंक, फडतूस, निर्ढावलेला, निर्घृण, निर्दयी, मनोरुग्ण आदी शब्द ऐकायला मिळाले आहेत.

लोकांमध्ये संतापाची लाट :एकिकडं महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांकडून गलिच्छ भाषा ऐकायला मिळत असताना, दुसरीकडं राजकीय नेत्यांविषयी लोकांमध्ये प्रचंड चीड आणि संतापाची भावना आहे. आम्ही लोकप्रतिनिधींना विभागातील विकास करण्यासाठी निवडून देतो, ऐकमेकांना शिव्या देण्यासाठी किंवा तुमचा वैयक्तिक राग काढण्यासाठी नाही, असा नाराजीचा सूर सामान्य लोकांमध्ये आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी जनता मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहे. तसेच वाईट भाषेमुळं नेत्यांवरील विश्वासार्हता हळूहळू कमी होत आहे, असंही चित्र पाहयला मिळत आहे.

हे चित्र महाराष्ट्रासाठी घातक :"महाराष्ट्रात सध्या ज्या भाषेचा वापर राजकीय नेत्यांकडून होत आहे. ते अत्यंत चुकीचं आहे. सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षातील लोकांवर दबाव टाकण्याच प्रयत्न होत आहे. पत्रकार परिषेदत उघडपणे शिव्यांचा वापर होत आहे, असं कधी यापूर्वी घडलं नव्हतं. पण आता नेते ऐकमेकांना लाखोली वाहत आहेत, शिव्या देताहेत हे चित्र महाराष्ट्रासाठी खूप घातक आहे," असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे. तसेच "टीकेला उत्तर तुम्ही चांगल्या शब्दातून चांगल्या भाषेतूनही देऊ शकता. यासाठी खालची पातळी गाठण्याची आवश्यकता नाही. मात्र दुर्दैवानं सध्या चांगली भाषा कमी आणि शिव्यांचा वापर अधिक होत आहे, हे महाराष्ट्रासाठी घातक आणि गंभीर आहे," असं ही राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. "दाढी हलकी समजू नका, काडी फिरवली तर लंका जळून जाईन"; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर तोफ
  2. महाराष्ट्र राज्य 'गांx' च्या हातात गेल्यानं गुंड फोफावले; संजय राऊतांची भाजपावर जहरी टीका
  3. उघडा नागडा पोपट काय करतोय, आणखी चार खासदारांचे व्हिडिओ लवकरच बाहेर येतील - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details