मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज मंगळवार (दि. 27 फेब्रुवारी) रोजी मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. तर, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अर्थसंकल्प चांगला आणि सर्व घटकांचा विचार करुन अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला असल्याचं म्हटलं आहे. तर, ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या अर्थसंकल्पावरुन सरकारवर निशाणा साधला आहे.
मागच्याच घोषणांजी उजळणी :माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "हा फसवा आणि तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प होता. मागचेच पान पुढं ढकललं आहे. यामध्ये कुठल्याही घटकाला ठोस काही मिळालेली नाही. सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. पुढचे पाठ आणि मागचे सपाट असा हा अर्थसंकल्प आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.
कॉन्ट्रकर मित्र जोमात शेतकरी कोमात :पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आजचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे ''कॉन्ट्रकर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात'' आहेत. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये फक्त आणि फक्त घोषणांची खैरात आहे. बाकी काहीही नाही. अवकळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल असं वाटत होतं. मात्र, शेतकऱ्यांना कोणतीच मदत सरकारकडून मिळाली नाही. विकासाच्या नावाखाली करोडो रुपयांच्या योजनांच्या घोषणा झाल्या. पण त्यातून हाती काही लागलं नाही,ठ असा निशाणा उद्धव ठाकरेंनी सरकारवर साधला.
सर्व घटकांची निराशा :"राज्यात अंगणवाडी सेविकांच्या पगाराच्या प्रश्नाबाबत देखील तोडगा निघाला नाही. राज्यातील शिवकालीन गडकिल्ले यासाठी काही तरतूद किंवा मोठी घोषणा होईल, असं वाटत होते. मात्र, तसं झालं नाही. मुंबईतील रस्त्याचा घोटाळा आहे. टेंडरवर टेंडर काढली जात असून त्यात भ्रष्टाचार केला जात आहे. महिला, विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी यासह सर्वच घटकांना अर्थसंकल्पातून काहीही मिळालं नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.