पुणे :आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत राज्य सरकार तसंच गुगल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, शाश्वत विकास, स्टार्टअप क्षेत्रातील महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात स्वाक्षरी करण्यात आली. गुगलच्या मदतीनं, राज्य सरकार या क्षेत्रांमध्ये जिओडेटा मॅनेजमेंट, डायग्नोस्टिक्स, शहरी पर्यावरण, विकास, कौशल्य प्रशिक्षण यांसारख्या क्षेत्रात गुगलची मदत घेणार आहे. या सामंजस्य करारावर राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर तसंच गुगलचे भारतातील प्रमुख संजय गुप्ता यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
विविध क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर : AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी, आरोग्य क्षेत्रात शाश्वत बदलांसह सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गुगल इंडियाच्या मुंढवा येथील कार्यालयात महाराष्ट्रातील कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील विकासासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) चा वापर करण्यात येणार आहे.
AI तंत्रज्ञानामुळं झपाट्यानं बदल :आज संपूर्ण जग तंत्रज्ञानावर चालत असून तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रशासन चालवणं 'हा' अत्यंत सकारात्मक बदल आहे. गेल्या 6 महिन्यांत AI तंत्रज्ञानामुळं झपाट्यानं बदल झाले आहेत. त्यामुळं 'या' तंत्रज्ञानातही तेवढ्याच वेगानं बदल होणे अपेक्षित आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी वेगानं पावलं उचलणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं हा करार अल्पावधीत सकारात्मक दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. नवीन तंत्रज्ञानामध्ये लोकांचं जीवनमान बदलण्याची क्षमता असून अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.