ठाणे State Excise Action : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू आहे. 16 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत केलेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी 56 लाख 840 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.
आतापर्यंत 190 आरोपींना अटक : ठाणे जिल्ह्यात छुप्या मार्गानं होणारी मद्यतस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असते. निवडणुक काळात तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं आपल्या सर्व पथकांना सतर्क राहण्याचं सांगितलंय. आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागही अॅक्शन मोडवर आला आहे. 16 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत ठाणे विभागात अवैध मद्य निर्मिती, तस्करी, विक्री, वाहतूक अशा प्रकारच्या 311 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय. यापैकी 188 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. विभागानं केलेल्या कारवाईत 1 कोटी 56 लाख 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या गुन्ह्यांमधून आतापर्यंत 190 आरोपींना अटक केलीय. तर कारवायांमध्ये नऊ वाहने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
विशेष भरारी पथकं तैनात : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसंच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे विभागाकडून दोन नियमित व विशेष भरारी पथकं तयार केली आहेत. ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येऊन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसंच रात्रीची गस्त घालण्यात येत आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर कारवाई करण्यात येते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, तस्करी, वाहतूक आणि विक्रीवर विभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवून मतदान होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात असल्याचे उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी सांगितले.
हेही वाचा :
- सोने तस्करीच्या कारवाईत डीआरआयच्या हाती घबाड, झवेरी बाजारातून कोट्यवधींच्या रकमेसह 18.48 किलोसह 9.67 किलो चांदी जप्त - DRI raid zaveri bazar
- सलमान खान गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन घेतले महत्त्वाचे निर्णय, लॉरेन्स टोळीवर होणार मोठी कारवाई - Salman Khan House Firing