नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे काटोलचे उमेदवार सलील देशमुख हे उमेदवारी अर्ज भरायला गेले असता सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघ्या दोन मिनिटांचा उशीर झाल्यामुळे सलील देशमुख यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आलेला नव्हता. परंतु आज(मंगळवार) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे पाच वर्षांपूर्वी 2019च्या निवडणुकीत अनिल देशमुख यांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उशीर झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना अर्ज दाखल करावा लागला होता. खरं तर ठीक पाच वर्षांनी आज सलील देशमुख यांच्या संदर्भातही तसंच घडलंय.
सलीलच्या नावावर शिक्कामोर्तब:गेल्या अनेक दिवसांपासून काटोलमधून अनिल देशमुख की सलील देशमुख कोण लढणार? असा सस्पेन्स कायम होता. शरद पवार यांनी सुरुवातीला अनिल देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, काटोलमधून सलील देशमुख निवडणूक लढवेल, असे अनेकदा अनिल देशमुख सांगत होते. अखेर सलील देशमुख यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलंय.
मला विधान परिषदेवर घेतील - देशमुख:माझ्याऐवजी सलील देशमुख काटोलचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील, असंही अनिल देशमुखांनी स्पष्ट केलंय. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शरद पवार मला विधान परिषदेवर घेतील आणि सरकारमध्ये मंत्री करतील, असाही दावाही अनिल देशमुख यांनी केलाय.
काटोलच्या मतदारांचे नुकसान होऊ देणार नाही:उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये अनिल देशमुख यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल न करण्यामागे काय कारण आहे हे सविस्तर सांगितलंय. काटोलमधून अनिल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असता तर सत्ताधाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणाने रद्द करत पुन्हा ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा मागे लावला असता, असा दावाही अनिल देशमुख यांनी केलाय. काटोलच्या मतदारांचे नुकसान होऊ नये म्हणून सलील देशमुखला संधी दिली, असे अनिल देशमुख म्हणालेत.
भाजपामुळेच माझ्या पत्नीला कर्करोग झाला:भारतीय जनता पक्षाने मला ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्रास दिला, त्यामुळे माझ्या पत्नीला कर्करोग झाला. आजवर 14 केमोथेरेपी माझ्या पत्नीला घ्याव्या लागल्याचा दावाही अनिल देशमुखांनी केलाय.