दौसा(राजस्थान) CM Eknath Shinde visited Mehndipur Balaji : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबासह राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील सिद्धपीठ मेहंदीपूर बालाजी धाम येथे पोहोचले. येथे त्यांनी बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं. तिथं त्यांनी विशेष पूजा केली. तसंच बालाजी महाराजांना सुका मेव्यासह मिठाईचा प्रसाद अर्पण केला. यावेळी सिद्धपीठ बालाजी धामचे पीठाधीश्वर महंत डॉ. नरेशपुरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धामबाबत सविस्तर माहिती दिली.
ट्रस्टच्या लोककल्याणकारी योजनांची घेतली माहिती : महंत नरेशपुरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालाजी मंदिर ट्रस्टतर्फे राबविल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रस्टनं चालवल्या जाणाऱ्या मुलींचं मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा तसंच भाविकांसाठी मोफत लंगर व्यवस्थेचं कौतुक केलं. यानंतर त्यांनी राम मंदिरात जावून दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मेहंदीपूर बालाजीला आले होते. त्यामुळं लोकसभा निवडणुकीपूर्वीचा त्यांचा राजस्थान दौरा चर्चेत आहे. पाच डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीनं मेहंदीपूर बालाजीला पोहोचून बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं होतं.