सोलापूर Ashadhi Wari 2024 : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पदस्पर्श दर्शन रांग आषाढी एकादशीच्या वेळी गोपाळपूरपर्यंत जाते. वारकऱ्यांना विठूरायाचं पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी तब्बल 18 ते 20 तास लागतात. त्यामुळे तिरुपतीच्या धर्तीवर भाविकांना टोकन पद्धत सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. या टोकन पद्धतीसाठी तब्बल 103 कोटी रुपये लागणार असून राज्य सरकार ते तत्काळ मंजूर करुन भाविकांसाठी टोकन पद्धत सुरू करेल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी टोकन पद्धत सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली होती.
गोपाळपूर रोडवर दर्शन मंडप उभारुन होणार टोकन व्यवस्था :गोपाळपूर रोडवरील पत्राचे शेड या ठिकाणी दर्शन मंडप उभारुन टोकण व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 103 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा केली. ग्रामविकास खात्यामार्फत हा निधी दिला जाणार असून त्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पंढरपूरमध्ये मोठ्या चार वाऱ्या भरतात, त्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरमध्ये येतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं पंढरपूरमध्ये 1000 बेडचं सुसज्ज रुग्णालय उभाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.