पुणे - महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात न आल्याने छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन करण्यात आलेय. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निषेध करत काळ्या पोषाखात ओबीसी समाज बांधवांनी 17 डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अजित पवार यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो निषेध आंदोलन' केलंय. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर आक्रमक झाले असून, त्यांनी थेट ओबीसी समाजाला चॅलेंज करीत याचा रिप्लाय जर द्यायचा असेल तर आम्ही महाराष्ट्रात कुठेही देऊ शकतो, असं यावेळी दीपक मानकर म्हणालेत.
दादांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन :यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले की, आजपर्यंत भुजबळ साहेबांना जेवढ्या संधी मिळाल्या, तेवढ्या संधी कोणत्याही ओबीसी नेत्याला मिळालेल्या नाहीत. ज्या दादांनी तुम्हाला मोठं केलं, त्याच दादाच्या प्रतिमेला जोडो मारत आहात. एकटे भुजबळ साहेब ओबीसीचे नेते नसून पक्षाला जी 10 मंत्रिपदं मिळाली आहे, त्यापैकी 4 मंत्रिपदं ओबीसी नेत्यांना दिली आहेत. भुजबळ साहेब यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागतील, त्याच पद्धतीने उत्तर आम्ही देऊ, असा इशारा यावेळी मानकर यांनी दिलाय.
महाराष्ट्रात अनेक ओबीसी नेते : ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ एकटे ओबीसी नेते नसून महाराष्ट्रात अनेक ओबीसी नेते आहेत. भुजबळ यांच्या आडून कोणीही दुकानदारी करू नये आणि आमच्या नेत्यांवर अशा पद्धतीने जर जोडो मारो आंदोलन करण्यात येणार असेल, तर आम्हीदेखील जशास तसे उत्तर देऊ, असंदेखील यावेळी मानकर यांनी म्हटलंय.
...तर आम्हीदेखील जशास तसं उत्तर देऊ; दीपक मानकर यांचं भुजबळ समर्थकांना ओपन चॅलेंज - MAHARASHTRA CABINET EXPANSION NCP
राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी थेट ओबीसी समाजाला चॅलेंज करीत याचा रिप्लाय जर द्यायचा असेल तर आम्ही महाराष्ट्रात कुठेही देऊ शकतो, असं म्हणालेत.
दीपक मानकर (Source- ETV Bharat)
Published : Dec 18, 2024, 1:06 PM IST