मुंबई -महायुती सरकारचा (16 डिसेंबर) सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होणार आहे. 1991 नंतर उपराजधानी नागपुरात पहिल्यांदाच मंत्र्यांचा शपथविधी पार पडत आहे. त्यामुळं या शपथविधीकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. महायुतीतील 39 जणांना शपथविधीसाठी फोन गेल्याची माहिती समोर येतेय. यात भाजपाचे 19, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांना शपथविधीसाठी फोन गेलाय. विशेष म्हणजे गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
भाजपा-सेनेत कोणाला डच्चू :भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सुरेश खाडे यांना मंत्रिपदासाठी अद्यापपर्यंत फोन गेल्या नसल्यानं यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचं बोललं जातंय. तर शिवसेनेत गेल्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना अद्यापर्यंत शपथ घेण्यासाठी फोन गेलेला नाहीये. या तिघांना पक्षसंघटनेसाठी मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जातंय.
राष्ट्रवादीत या नेत्यांना मिळाला डच्चू :अद्यापपर्यंत छगन भुजबळ, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांना शपथ घेण्यासाठी फोन गेलेला नाहीये. त्यामुळं यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. गेल्या मंत्रिमंडळात वरील चेहरे होते. मात्र अद्यापपर्यंत यांना फोन गेल्या नसल्यानं यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचं बोललं जातंय. तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 9 मंत्रिपंद मिळतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय. आज महायुतीतील 38 जणांना शपथविधीसाठी फोन गेल्याचं बोललं जातंय
कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद? : मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा मुंबईतील आझाद मैदान येथे 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडलाय. परंतु त्यानंतर स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर आमदारांचा शपथविधी लांबणीवर गेल्यामुळं महायुतीत समन्वय नसून मतभेद असल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र अखेर आज (रविवारी) मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होत आहे. महायुतीत 38 जणांना शपथविधीसाठी फोन गेला आहे. यामध्ये भाजपाचे 19 जणांना फोन केला असून, भाजपाचे 19 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेमध्ये 12 जणांना फोन गेला असून, 12 जण आज शपथ घेणार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 7 जणांना शपथविधीसाठी फोन केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.