मुंबई Maharashtra Budget Session 2024 :अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विरोधकांनी एकत्र येत विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. फसवे सरकार, खोके सरकार, हाय.. हाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. ओबीसींना फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? मराठ्यांना फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? अशा पद्धतीच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. याप्रसंगी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, भाई जगताप, नितीन राऊत आदी नेते उपस्थित होते.
विधान भवनच्या पायऱ्यांवर आंदोलन : विरोधकांचा प्रस्ताव बुधवारी येत आहे. आम्ही शासनाला पत्र देऊन विनंती केली की प्रश्नोत्तरे नाही निदान लक्षवेधी ठेवा, कारण पुढील पाच महिने बोलायला मिळाणार नाही. पण त्यांनी ते मान्य केलं नाही. आमचा प्रस्ताव जेव्हा येईल तेव्हा सरकारच्या कारभाराच्या चिंधड्या करुन टाकू, असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. सर्व पाप त्यांनी करायचे आणि आरोप विरोधकांवर लावायचे हे चालणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केलीय.
मंगळवारी सादर होणार अर्थसंकल्प :अर्थमंत्री अजित पवार हे उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज आदीबाबतच्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याअनुषंगानं आमदारांच्या मतदारसंघातील रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प यांसह अन्य कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याचे संकेत आहेत.