मुंबईत पहाटे 2.30 वाजल्यापासून मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रुळांवर पाणी साचले होते. या ठिकाणी बसवण्यात आलेल्या उच्च क्षमतेच्या पंपामुळं तसंच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळं साचलेले पाणी बाहेर काढण्यात आले. या प्रयत्नांमुळे कोणत्याही मार्गावर कोणत्याही व्यत्ययाशिवाय रेल्वे धावू शकली, शिवाय, कोणत्याही लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक बदलले गेले नाही आणि त्या वेळापत्रकानुसार धावत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
मुंबईतील रेल्वे सेवा सुरळित, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस वेळेनुसारच - पश्चिम रेल्वे - Maharashtra Breaking News Live - MAHARASHTRA BREAKING NEWS LIVE
Published : Jul 8, 2024, 8:39 AM IST
|Updated : Jul 8, 2024, 6:27 PM IST
'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
LIVE FEED
मुंबईतील रेल्वे सेवा सुरळित
राजेश शाहला जामीन मंजूर
मुंबई - वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणी नवीन माहिती हाती आली आहे. या प्रकरणी राजेश शाहला जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टानं त्याला जामिन मंजूर केला आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शाह यांना न्यायालयीन तर दुसऱ्याला पोलीस कोठडी
वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शाह यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर कारमध्ये उपस्थित असलेल्या राजेंद्रसिंग बिडावत याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अतिवृष्टीबाबत मुंबईकरांना आवाहन
मुंबई Maharashtra Weather Updates - राज्यात मुंबई, रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर शेकडो पर्यटकांची सुटका करण्यात आली. रायगडावरील पावसाचे व्हिडिओ अंगावर शहारे आणणारी आहेत. पर्यटनस्थळी जाणाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं.
मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका! आमदार संजय गायकवाडसह अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकले!
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका अधिवेशनात जाणाऱ्या अनेक आमदारांनाही बसला आहे.यामध्ये कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांचाही समावेश. रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे कुर्ला हावडा मेल मागच्या दोन तासापासून अडकले आहेत. यामध्ये आमदार संजय गायकवाड, आमदार अमोल मिटकरी, आमदार जोगेंद्र कवाडे आणि आमदार धीरज लिंगाडे आणि इतर आमदार हावडा मेलमध्ये अडकले आहेत.
पावसामुळे विधानसभेचे कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब
पावसामुळे आमदारांची उपस्थिती नसल्याने विधानसभेचे कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. १ वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. तर संध्याकाळी सहा वाजता सह्याद्री अथितीगृहावर आरक्षण विषयावर सर्वपक्षीय बैठक आहे.
तिजोरीवर डाका टाकणारे सत्तेत बसल्यामुळे मुंबईची अशी दुर्दशा-विजय वडेट्टीवार
मुंबईच्या तिजोरीवर डाका टाकणारे सत्तेत बसल्यामुळे मुंबईची अशी दुर्दशा झाली आहे. मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार हे मुंबईच्या परिस्थितीला जबाबदार आहे. राज्याचे पुनर्वसन मंत्री जर अडकत असेल तरी सामान्यांचे काय? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळित, उपनगरीय गाड्यांना 10 मिनिटे उशीर
ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसएमटी-ठाणे दरम्यानच्या डाऊन आणि अप जलद मार्गावरील मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा बंद आहे. मात्र, डाऊन आणि अप धीम्या मार्गावर धावत आहेत. चुनाभटी येथे पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील सेवा तात्पुरती बंद आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील चुनाभट्टी भागातील रस्ते आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. सायन भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील कुर्ला भागात पाणी साचले आहे. त्यामुळे बस, कार आणि इतर वाहनांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणे अवघडत आहे. मुसळधार पावसामुळे माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावरून पाणी साचल्याने उपनगरीय गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे रुळांवरून पाणी काढून टाकण्यासाठी उच्च क्षमतेचे जलपंप वापरले जात आहेत: वडाळा आणि जीटीबी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे.
पावसाचा मंत्र्यांनाही फटका, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास
मुंबईतील पावसाचा फटका विधिमंडळाच्या अधिवेशनाला होणार आहे. विदर्भ मराठवाड्यातील काही आमदार रेल्वे एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे दादरच्या दिशेने पायी रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करत आहेत.
हिट अँड रन प्रकरणाने पुणे पुन्हा हादरले, पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू
हिट अँड रन प्रकरणाने पुणे शहर पुन्हा हादरले. मध्यरात्री जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री पावणे दोन वाजता पुणे पोलिस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर दुसरे पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईत मध्यरात्री १ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मुंबई- मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक रेल्वे रद्द झाल्या आहेत. मुंबई महानगरात काल मध्यरात्री १ वाजल्यापासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे काही सखाल भागांमध्ये पाणी साचले. दुसरीकडं उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांचे हाल झाले. विद्यार्थ्यांना पावसाळ्यात त्रास होऊ नये, याकरिता मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात आली. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं म्हटलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं महापालिकेकडून आवाहन करण्यात आलं.