मुंबई Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल म्हणजेच गुरुवारी पहिल्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर विविध प्रश्नावरून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं. तर सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच गुरुवारी ज्या आमदारांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपणार होता, त्यांचा निरोप समारंभ पार पडला. दरम्यान, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार हे सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडं सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
घोषणांचा पाऊस पडणार? : सरकारचा कार्यकाळ पुढील तीन ते चार महिन्यात संपणार आहे. त्यामुळे सरकारचं हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. सरकारकडून शेवटचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुका पार पडल्या. यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. 40 प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीच्या पदरी अपयश आलं. त्यामुळं आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, महिलांना आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. "सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून मोठमोठ्या घोषणा होऊ शकतात. पण याची अंमलबजावणी करण्यासाठी हे सरकार राहिले तर पाहिजे. सरकारचे हे शेवटचे बाय-बाय करणारे अधिवेशन असणार आहे," अशी टीका विरोधकानी केली.