मुंबई Maharashtra Monsoon Session 2024 : राज्य विधिमंडळाच्या चौदाव्या विधानसभेच्या पाच वर्षाच्या कालावधीतील शेवटचं अधिवेशन शुक्रवारी (12 जुलै) पार पडलं. या अधिवेशनात राज्य सरकारनं 20000 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला, तर 94 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि मराठा ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्याला प्रत्युत्तर देत कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. काही नव्या घोषणा आणि विधेयकं मंजूर करत राज्य सरकारनं हे अधिवेशन पार पाडलं.
विधानसभेतील कामकाज : विधानसभेत एकूण बैठकींची संख्या 13 प्रत्यक्षात झालेले कामकाज 91 तास दोन मिनिटं, सभागृहाचा वाया गेलेला वेळ तीन तास 19 मिनिटे इतका होता. रोजचं सरासरी कामकाज सात तास इतकं पार पडलं. या अधिवेशनात 5571 तारांकित प्रश्न प्राप्त झाले, त्यापैकी 337 प्रश्न स्वीकृत झाले, तर 32 प्रश्नांना उत्तरं देण्यात आली. सभागृहात 12 अल्प सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 10 अल्प सूचना स्वीकृत करण्यात आल्या. विभागास खुलासा विचारण्यात आलेल्या अल्पसूचनांची संख्या दोन इतकी आहे. नियम 97 अन्वये स्थगन प्रस्तावाच्या 54 सूचना प्राप्त झाल्या, एकही सूचना स्वीकारण्यात आली नाही. सभागृहात 2115 लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या, त्यापैकी 382 सूचना मान्य केल्या आणि 55 सूचनांवर चर्चा करण्यात आली. 188 ठराव सभागृहात प्राप्त झाले, त्यापैकी 131 ठराव मान्य करण्यात आले. एक शासकीय ठराव प्राप्त झाला आणि मान्य करुन त्यावर चर्चा ही करण्यात आली. अंतिम आठवडा प्रस्तावाची एक सूचना आली, त्यावर चर्चा झाली. नियम 293 अन्वये चार सूचना प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी चार सूचना मान्य करण्यात आल्या, दोन सूचनांवर चर्चा झाली. अर्धा तास चर्चेच्या 73 सूचना प्राप्त झाल्या, त्यापैकी 20 सूचना मान्य करण्यात आल्या, मात्र एकाही सूचनेवर चर्चा झाली नाही. प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवलेल्या 49 प्राप्त सूचना होत्या, त्यापैकी 26 सूचना मान्य करण्यात आल्या, दोन सूचनांवर चर्चा करण्यात आली. अशासकीय विधेयकांची एक सूचना प्राप्त झाली, ती मान्य करुन पूरस्थापनार्थ ठेवण्यात आली.