मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Assembly Election Results 2024) चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी जुळवाजुळव झाली. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीसमोर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. पण निकालानंतर महाविकास आघाडीला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद देखील नशिबी आलेलं नाही. विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाल्याचं बोललं जातंय.
दहा टक्के जागांची मर्यादा :महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) यापैकी कोणत्याही पक्षाला 20 पेक्षा जास्त जागा निवडून आणता आलेल्या नाहीत. विरोधी पक्षनेतेपदासाठी लोकसभा तसंच विधानसभेत एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणात ठराविक संख्याबळाची आवश्यकता असते. त्यामुळं लोकसभा आणि विधानसभा नियमावलीनुसार एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद तेव्हाच मिळतं, जेव्हा राज्यातील विधानसभेच्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागा असतात. सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला किमान दहा टक्के जागांची मर्यादादेखील ओलांडता आली नाही. महाविकास आघाडीसाठी विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग देखील बंद झालाय.