मुंबई-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा अन् शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळेंनी त्यांचे चुलत बंधू अजित पवार यांच्याशी राजकीय युती करण्याच्या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्यात. सुप्रिया सुळे यांनी पीटीआयला एक विशेष मुलाखत दिलीय. त्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. आता राजकीयदृष्ट्या एकत्र येणं शक्य नाही. खरं तर अजित पवारांबरोबरच्या वैचारिक लढाईवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार आणि त्यांचा पक्ष हे भाजपाचे मित्रपक्ष आहेत, त्यामुळे आमच्या दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. अजित पवार यांच्याशी राजकीयदृष्ट्या पुन्हा एकत्र येणं अवघड आहे. जोपर्यंत ते भाजपासाठी काम करीत आहेत, तोपर्यंत ते कदापि सोपे होणार नाही. राजकीयदृष्ट्या आमच्या विचारसरणीत मतभिन्नता आहे, असंही सुप्रिया सुळेंनी अधोरेखित केलंय.
मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही:तुम्ही मुख्यमंत्री होणार का? यावर त्या म्हणाल्या की, मी विधानसभेची निवडणूक लढवत नाही अन् मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये स्पष्टता आहे, त्यामुळे आमचे मित्र पक्ष जो निर्णय घेतील, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ," असंही सुप्रिया सुळेंनी अधोरेखित केलंय. तसेच अजित पवार अन् युगेंद्र पवारांच्या लढाईवर त्या म्हणाल्यात की, बारामतीच्या जागेवर अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यातील लढत ही केवळ वैचारिक लढाई असल्याचंही सुप्रिया सुळे सांगतात. 'आम्ही काँग्रेससोबत आहोत आणि ते (अजित पवार) भाजपासोबत आहेत. आम्ही भाजपाशी लढत असल्यानं त्यांचे मित्र पक्षही आमचे विरोधकच आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
चांगले धोरणात्मक काम करण्याला आमचं प्राधान्य: महाविकास आघाडी 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल. कारण राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी आम्ही 30 जागा जिंकल्यात. विशेष म्हणजे आम्हाला पाठिंबा देणारा अपक्षदेखील विजयी झाला, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. येत्या विधानसभा निवडणुकीमुळे विस्कटलेल्या राजकारणाची घडी बसवण्यास मदत मिळेल का? त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी सगळा संभ्रम दूर केलाय. बेकायदेशीर मार्गानं पक्ष फोडले, त्यावर कायदेशीर लढाई सुरूच आहे. तसेच यापुढे फक्त 10 लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवण्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. आमचा पक्ष हा जनतेची सेवा करण्यासाठी स्थापन झालाय, आम्ही कोणतीही रणनीती आखत नाही. देशाची सेवा करण्याबरोबरच चांगले धोरणात्मक काम करण्याला आमचं प्राधान्य आहे. आमचा राष्ट्रवादी पक्ष विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 86 जागा लढवत आहोत. तसेच आम्हाला या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात विलंब झाल्याचं त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, यात काहीही गैर नाही. लोकशाही आघाडीच्या चर्चेला वेळ द्यावा लागतो. आपणही आपल्या मित्र पक्षांबाबत आदर बाळगला पाहिजे. आम्ही कोणाचाही बुलडोझर होऊ दिला नाही, असंही त्यांनी सांगितलं.