महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"आहे आनंदाची दिवाळी, आता वेळ आहे महायुतीच्या सत्तेची पाळी", चारोळीतून आठवलेंचा शरद पवारांवर हल्लाबोल - RAMDAS ATHAWALE ON RAJ THACKERAY

मित ठाकरेंच्या लग्नाला उपस्थित राहिलो असलो म्हणजे त्यांना पाठिंबा द्यावा असं काही नाही, असा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावलाय.

Ramdas Athawale
रामदास आठवले (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2024, 7:08 PM IST

मुंबई -सध्या विधानसभा निवडणुकीमुळं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात रॅली, प्रचार सभा यांचं आयोजन करण्यात येतंय. दरम्यान, राज्यात कोणाचे सरकार येणार महायुती की महाविकास आघाडी? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, तर्कवितर्क लढवले जाताहेत. मात्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असून, "आहे आनंदाची दिवाळी, आता वेळ आहे महायुतीच्या सत्तेची पाळी," असं म्हणत माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांना आमचा पाठिंबा असल्याचंही आठवलेंनी सांगितलंय. मनसे अध्यक्ष आणि राजपुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा नाही, राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. ते मोठे नेते आहेत. त्यांच्या सभेला तरुणांची मोठी गर्दी होते. पण त्यांचे आमदार किती निवडून येतात? आणि जरी मी अमित ठाकरेंच्या लग्नाला उपस्थित राहिलो असलो म्हणजे त्यांना पाठिंबा द्यावा असं काही नाही, असा टोला केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावलाय. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.


मलिकांना उमेदवारी हे चुकीचंच : पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मानखुर्द-शिवाजीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाने) नवाब मलिक यांना तिकीट दिलंय आणि इथेच शिंदे गटाचे सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र आमचा सुरेश पाटील यांना पाठिंबा आहे. नवाब मलिक यांना पाठिंबा देणार नाही. आम्ही महायुतीत सुरुवातीला पाच जागा मागितल्या होत्या. पण आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत. एक कलिना आणि दुसरी धारावी या विधानसभा मतदारसंघात आरपीआयचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल, असा मला विश्वास आहे, असं रामदास आठवले म्हणालेत.

आमच्या मागून आले आणि सत्तेचे वाटेकरी झाले: महायुतीला राज्यात चांगलं वातावरण आहे. सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल. मात्र सत्ता आल्यानंतर आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे आणि एक मंत्रिपद मिळालं पाहिजे. विधान परिषदेवर आम्हाला संधी देण्याचं महायुतीतील नेत्यांनी आश्वासन दिलंय. आता ते आश्वासन पाळतात की नाही? ते पण पाहावे लागेल. पण जेव्हा महायुतीचं सरकार अस्तित्वात आलंय. तेव्हा मंत्रिमंडळात तुम्हाला संधी देण्यात येईल, असं म्हटले होतं. परंतु आम्हाला संधी दिली नाही. आमच्या मागून अजित पवार आले आणि ते सत्तेचे वाटेकरी झाले. परंतु आम्हाला सत्तेतील वाटा मिळाला नाही. म्हणून आता आमचा यांच्यावर विश्वास नाही. सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात आमच्या पक्षाला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे, अशी ही आमची मागणी आहे. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यांच्यात अनेक जागा मिळाल्या पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमची आठवण ठेवलीय. मोदींनी देशात अनेक महत्त्वपूर्ण कामं आणि योजना केल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मी केंद्रीय मंत्रिमंडळात आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

राज ठाकरेंनी पक्ष बरखास्त करावा: काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदावरून टीका केली होती. याला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले की, ते गर्दी जमवणारे नेते आहेत. तरुणांचा मोठा वर्ग त्यांच्याकडे आहे. पण गर्दीचे रूपांतर मतात होत नाही. त्यांचे किती आमदार येतात हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्यांनी माझ्या मंत्रिपदावर टीका केली. परंतु त्यांचा पक्ष किती टिकतो आणि त्याचा किती विस्तार होतो हे त्यांनी बघावे. राज ठाकरेंनी आपला पक्ष बरखास्त करावा, अशी टीका रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर केली/. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजासाठी जो लढा दिलाय. त्यामुळं समाज जागृत झालाय. आमच्या समाजामध्ये मी समाजाला जागृत केलंय. शरद पवार यांनी राजकीय जीवनातून निवृत्त होऊ नये. त्यांच्यासारखे नेत्याची महाराष्ट्राला, देशाची गरज आहे. ते सक्षम नेते आहेत. या वयातसुद्धा ते काम करतात. या वयात त्यांना अजित पवार यांच्यामुळे काम करावे लागत आहे, असा टोला रामदास आठवले यांनी शरद पवारांना लगावलाय.

हेही वाचा-

  1. देवेंद्र फडणवीस हा नतद्रष्ट माणूस; संजय राऊत यांचा घणाघात
  2. भारत जोडोच्या नावाखाली समाजात अराजकता पसरवण्याचं काम- देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details