मुंबई -जस जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तस तसे एकमेकांवर चिखलफेक करण्यात राजकीय नेते जोमाने पुढे सरसावताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपसुद्धा अशाच पद्धतीनं पुढे जाताहेत. उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना इशारा दिलाय.
राज ठाकरे हे दुसरे मोरारजी देसाई; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही. मोरारजी देसाईंनंतर गुजरात, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
Published : Nov 12, 2024, 12:20 PM IST
लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी :याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापूर्वी भान ठेवावे. राज ठाकरे हे गुजरातमधील दोन व्यापाऱ्यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपसुद्धा संजय राऊत यांनी केलाय. राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही. मोरारजी देसाईंनंतर गुजरात आणि महाराष्ट्र येथे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या अस्मितेचा प्रचार करतात. त्यांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि महाराष्ट्राची लूट चालवली. आणि अशा परिस्थितीत हे महाशय (राज ठाकरे) त्यांच्यासोबत आहेत. आम्हाला मोरारजी देसाई यांची आठवण झाली. गुजरातच्या दोन खतरनाक व्यापार करणाऱ्या विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लढाई सुरू आहे.
सुरक्षा तपासणीला विरोध नाही :वणी येथे उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोहोचले. सांगोल्यात 15 कोटी पकडले, परंतु केवळ 5 कोटी दाखवले 10 कोटींचा हिशोब नाही. उद्धव ठाकरे यांची तपासणी करायला आमचा अजिबात आक्षेप नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यामधून बॅगा उतरतात. एकनाथ शिंदे नाशिक, शिर्डी येथे गेले. दोन तासांसाठी एका हॉटेलमध्ये थांबले तर 15-16 बॅगा त्यांच्यासोबत होत्या, त्या कसल्या होत्या. आमच्या तपासण्या करता तर त्यांच्याही करा. करणार आहात की नाही? की यंत्रणा विकत घेतली आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय.
दादर - माहीम आमचं जन्मस्थान: दादर-माहीम जागेविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कुठल्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. दादर-माहीम प्रभादेवी येथे शिवसेनेचा जन्म झाला आहे. ते शिवसेनेचे जन्मस्थान आहे. ते जन्मस्थान आम्हाला कोणाला देता येणार नाही. अनेक भावनिक विषय असतात, त्यामध्ये दादर हा महत्त्वाचा भाग आहे. आणि तिथे आम्हाला लढावंच लागेल. आमचा उमेदवार विजयी होईल, असा दावासुद्धा राऊत यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात लोकांच्या जीवनात काळोख करायचा आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.
हेही वाचा-