जळगाव-विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांची भाषणंही आज ऐकायला मिळणार आहेत. अशातच माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी आज मोठी घोषणा करत राजकारणात खळबळ उडवून दिलीय. यापुढे मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलंय. मी गेली अनेक वर्ष आपल्यासोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केलंय, मला आशीर्वाद दिलेत. मीही तुमच्या सुख-दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात-धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडलीय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंनी दिलीय.
"यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही"; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी आज मोठी घोषणा करत राजकारणात खळबळ उडवून दिलीय. यापुढे मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलंय.
Published : Nov 18, 2024, 1:00 PM IST
|Updated : Nov 18, 2024, 1:24 PM IST
रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या :सध्या माझी तब्येत ठीक नसते, त्यामुळे पुढील निवडणूक मी पाहणार की नाही हे तो ईश्वरच आता ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेन किंवा नसेनही. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की, आपण सर्वांनी रोहिणीताईंना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं, तसं रोहिणीताईंना करावं आणि रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे ही विनंती, असं म्हणत एकनाथ खडसेंनी रोहिणी खडसेंना निवडून देण्याचं जनतेला आवाहन केलंय.
कोण आहेत एकनाथ खडसे? :एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून विधान परिषदेवर आमदार आहेत. तसेच ते महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री होते. 2009 पासून ते 2014 पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधी पक्षनेते होते. 1995-99 या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून विजयी झाल्यानंतर खडसे महसूलमंत्री आणि कृषिमंत्री झाले होते. तसेच पशुसंवर्धन दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक अशा खात्यांचेही ते मंत्री राहिलेत. 21 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली. 23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलाय. त्यानंतर परत त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं, मात्र काही दिवसांनंतर परत ते राष्ट्रवादी शरद पवार गटात परतले होते.
हेही वाचा-