पुणे -गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलंय. मुंबई ते गोवादरम्यानचा महामार्ग हा काही कंत्राटदार चांगले न मिळाल्यानं रखडलाय. तसेच महाराष्ट्रात मध्यंतरीच्या काळात युतीचं सरकार बदलून महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातही बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील आता याबाबत पुढाकार घेतला असून, राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर एक वर्षात मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल, असे मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलंय. पुण्यात आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.
केंद्राने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय : पुढे प्रमोद सावंत म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार सत्तेत आले पाहिजे. गोव्यामध्ये रस्ते, रेल्वे आणि विमानतळ याचा मागील दहा वर्षांत कायापालट झालाय. महाराष्ट्र विकसित करण्यासाठी महायुती सरकार राज्यात पुन्हा आलं पाहिजे. वर्ष 2014 मध्ये राज्यातील जनतेने भाजपाला बहुमत दिले. 2019 मध्येदेखील जनतेने युतीला साथ दिली. पण उद्धव ठाकरे यांच्या स्वार्थामुळे वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झालीय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत भाजपा राज्यात चांगल्या प्रकारे काम करीत आहे. मराठी भाषेमध्ये माझं शिक्षण झालं असून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काँग्रेसकडून कधी दिला गेला नसता, पण भाजपाच्या केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे, असं यावेळी प्रमोद सावंत म्हणालेत.