मुंबई -महायुती की महाविकास आघाडी, राज्यात कुणाचं सरकार येणार? याचा फैसला २३ नोव्हेंबरला होणार आहे. परंतु मुख्यमंत्री कोण असणार याचा फैसला दोन्ही आघाड्यांकडून घेण्यात आलेला नाही. सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही आघाडीने याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय. भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असली तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय महायुतीतील नेते घेतील, असे सांगून याबाबत सस्पेन्स कायम ठेवलाय. तर मी सर्वात कमी जागा लढवत असल्याने मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असूच शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख अजित पवारांनी सांगितलंय.
प्रत्येक पक्षाला हवं मुख्यमंत्रिपद :राज्यात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यात यावा, असा अट्टहास उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. उद्धव ठाकरे यांच्या या हट्टाकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही कानाडोळा केला होता. तरीही उद्धव ठाकरे यांनी त्यांचा हट्ट सतत लावून धरला. परंतु शेवटपर्यंत त्यांना त्यामध्ये यश आलं नाही. निवडणुका पार पडल्यावर ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं एकंदरीत चित्र स्पष्ट करण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाहीये. दुसरीकडे काँग्रेसमध्येसुद्धा मुख्यमंत्रिपदासाठी अनेक चेहरे इच्छुक आहेत. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं नाव या प्रकरणी दबक्या आवाजात पुढे केलंय. 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदाच्या कारणावरूनच राज्यात राजकारणातील महानाट्य घडलं होतं. 105 सर्वाधिक आमदार निवडून येऊनसुद्धा भाजपा पक्षाला विरोधात बसावं लागलं होतं. तर 40 आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची बाजी मारली होती. परंतु मागील पाच वर्षात राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे यंदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा निकालानंतरच घोषित करावा, असं एकमत आता महाविकास आघाडीत झालंय. तरीही आपल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळावं, याकरिता जास्तीत जास्त जागा निवडून यायला हव्यात. या कारणाने प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीत जोर धरलाय.
पुन्हा एकदा, देवाभाऊ : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जनाधार भेटूनसुद्धा भाजपाला विरोधात बसावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील फुटीनंतर सत्तेत आल्यावर केवळ 40 आमदारांचा पाठिंबा असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलंय. म्हणून यंदा मुख्यमंत्रिपद भाजपाकडेच राहणार आणि त्या पदावर देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार अशा पद्धतीने भाजपाने प्रचारही सुरू केलाय. "पुन्हा एकदा, देवा भाऊ" अशा पद्धतीच्या प्रचारामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात नाराजी दिसू लागली. यंदाच्या निवडणुका या महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवल्या जातील हे भाजपाकडून वारंवार सांगण्यात आलंय. पण महायुतीचा मुख्यमंत्री कोण? यावर मात्र कायम संभ्रमच राहिला. अखेर भाजपाच्या संकल्प पत्राची मुंबईत घोषणा करतेवेळी केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जात असून, निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करतील, असं सांगून तूर्तास या प्रश्नाला पूर्णविराम दिलाय.
फडणवीसांवर मराठा समाजाचा राग, तर बंडखोरांविषयी नाराजी :मुख्यमंत्रिपदाच्या या शर्यतीबाबत बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले आहेत की, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करणं हे महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांनाही घातक ठरलं असतं. महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा सर्वात जास्त फायदा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झाला यात दुमत नाही. याच कारणाने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा अट्टहास धरला होता. परंतु आताची समीकरण बदललीत. याकरिता काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाबाबत संयमी भूमिका घेतलीय. दुसरीकडे महायुतीबाबत सांगायचं झालं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती निवडणुका लढवत आहे. तरीही विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा महायुती घोषित करू शकत नाही. याचं महत्त्वाचं कारण मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याला जनतेमधून होणारा विरोध असू शकतो. ज्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात रान पेटवलं गेलंय, ते मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकरिता देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे शत्रू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत उमेदवार उभे केले नसले तरीसुद्धा राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार पाडण्यात आणि विजयी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असणार आहे. म्हणून भाजपाने जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांचं नाव निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणलं नाही, तर दुसरीकडे बंडखोरी करत पक्षात फूट पाडल्या कारणाने एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार यांच्याविषयी जनतेचं जनमत काय असू शकतं? याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आलीच आहे. म्हणून आताच्या घडीला कुणाचंही नाव घोषित करणं हे महायुतीसाठी धोकादायक आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेक नावे, पण तूर्तास चर्चा नकोच; भाजपाचा सावध पवित्रा - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
मी सर्वात कमी जागा लढवत असल्याने मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असूच शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख अजित पवारांनी सांगितलंय.
राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? (ETV Bharat File Photo)
Published : Nov 11, 2024, 5:50 PM IST