मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ सुरू आहे. तसंच विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिना शिल्लक असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आपापल्या मतदारसंघातील जागावाटपाची घोषणा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? : या संदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही सकारात्मक चर्चा करून अडचणीच्या जागा सोडवल्या आहे. येत्या दोन दिवसांत आम्ही काही उरलेल्या जागांबाबत निर्णय घेऊ. आम्ही ठरवलंय की क्लिअर झालेल्या जागा मित्रपक्षांनी त्यांच्या सोयीनुसार जाहीर कराव्यात. तर भाजपाची पहिली यादी कधीही येऊ शकते."
- एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, "शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी महायुतीच्या जागावाटपाविषयी सकारात्मक चर्चा झाली. चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच जागावाटप निश्चित होणार आहे."
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चर्चेनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. शिवसेना 85-90 जागा लढविण्याचा अंदाज आहे. तर अजित पवार यांना 50 जागा मिळू शकतात. तर उर्वरित जागा भाजपा लढवणार आहे.
लवकरच होणार घोषणा : काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी शनिवारी (19 ऑक्टोबर) शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या बैठका होत आहेत. लवकरच उमेदवारांच्या घोषणा होणार आहेत."
महाविकास आघाडीत बिघाडी? : जागावाटपावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक वाद शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बघायला मिळाला होता. "जर संजय राऊत उद्धव ठाकरेंवर नियंत्रण ठेवत असतील, तर तो त्यांचा मुद्दा आहे. आमच्या नेत्यांची वस्तुस्थिती सांगण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही ते करतोय. संजय राऊत काय करतात, यावर आम्हाला काहीही बोलायचं नाही," असं नाना पटोले म्हणाले होते. पटोलेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, यानंतर पुन्हा शनिवारी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक पार पडली. बैठक झाल्यानंतर सर्व नेत्यांनी एकत्र येत महायुतीवर जोरदार टीका केली. तसंच जागावाटपावरुन आमच्यात कोणताही वाद नसल्याचं या नेत्यांनी दाखवून दिलं.
बोगस मतं आणली : "महायुतीला आम्ही 'लफंगे' म्हणतो. या लोकांकडून अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. निवडणूक आयोगानं ॲप बनवून लोकांची मतं कमी करून बोगस मतं जोडण्याचं काम केलं जात आहे. प्रत्येक क्षेत्रात सुमारे 10 हजार बोगस मतं जोडली जात आहेत. आता महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे," असं म्हणत खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला.
महायुतीला पराभवाची भीती : "संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणं महायुतीचे सरकार निवडणूक हरण्याच्या भीतीनं मूळ लोकांची नावं निवडणुकीतून काढून टाकत आहे. बोगस मतदारांचा समावेश करत आहे. आम्ही निवडणूक आगोगाला पत्र लिहिलं आहे. निवडणुकीत पारदर्शकता आम्हांला दिसत नाही. निवडणूक आयोग मोदींच्या पायाखाली बसलेला दिसतोय," असं म्हणत नाना पटोलेंनी जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा -
- मोठ्या पक्षांच्या राजकारणात लहान पक्ष 'उपेक्षित', जागावाटपात दिलं जातंय दुय्यम स्थान
- बंडखोरीच्या धाकानं जागावाटपास विलंब; इच्छुकांसाठी यंदा अनेक पर्याय उपलब्ध
- महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, जागावाटप 80 टक्के पूर्ण