छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. काही ठिकाणी पराभूत उमेदवारांनी झालेल्या मतमोजणी बाबत आक्षेप घेतला. तर काही जणांनी व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी (Recounting of VVPAT Votes) विनंती अर्ज देखील केले. यासंदर्भात राज्यातील 22 उमेदवारांनी अर्ज केले असून जिल्ह्यातील शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यासह अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी या मतमोजणीची मागणी केलीय. तर सिल्लोड येथील उमेदवार सुरेश बनकर यांनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय.
मध्य मतदार संघाच्या उमेदवारानं भरले पैसे : जिल्ह्यात शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांनी मतमोजणीत तफावत असल्याचा आरोप केलाय. तसंच काही मतदान केंद्रातील मतमोजणी योग्य पद्धतीनं झाली नसल्याची तक्रार देखील पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. जिल्ह्यातील पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे (उबाठा) पराभूत उमेदवार राजू शिंदे आणि मध्य विधानसभा मतदार संघातील बाळासाहेब थोरात यांनी व्हीव्हीपॅट मोजणी करण्याची मागणी केलीय. इतकंच नाही तर बाळासाहेब थोरात यांनी मतदान केंद्रातील मोजणीसाठी लागणारे 47,200 रुपये प्रति मतदान केंद्राप्रमाणे दोन केंद्रांचे 94 हजार 400 रुपये निवडणूक विभागात भरले आहेत. यासंदर्भातील माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली. त्याचबरोबर कन्नड येथील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी देखील आयोगाकडं तक्रार नोंदवली आहे.