मुंबई :२० नोव्हेंबर रोजी ऐन दिवाळीत राज्यात विधानसभेसाठी निवडणूक होत असल्यानं राजकीय फटाक्यांची आतिषबाजी उडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असताना, भाजपानं त्यांच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह अशा केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांचा सुद्धा समावेश आहे.
आठवलेंना स्थान नाही : विशेष म्हणजे, महायुतीचा घटक पक्ष असलेले रिपाईचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा या यादीत समावेश नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर दुसरीकडं स्मृती इराणी, पंकजा मुंडे, नवनीत राणा या महिलांचा या यादीत समावेश करण्यात आलाय.
प्रचारासाठी केंद्र आणि राज्यातील 20-20 नेते : लोकसभा निवडणुकीसाठी देशात 'अब की बार ४०० पार' चा नारा देणाऱ्या भाजपानं यंदा विधानसभा निवडणुकीसाठी कुठलाही नारा दिलेला नाही. परंतु विकासाच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्य पिंजून काढण्यासाठी व विरोधकांच्या नाकी नऊ आणण्यासाठी भाजपानं त्यांच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण, नारायण राणे, आशिष शेलार, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार तसेच महिलांमध्ये स्मृती इराणी, पंकजा मुंडे व नवनीत राणा यांचाही समावेश आहे.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा बोलबाला : झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं स्मृती इराणी, नवनीत राणा, पंकजा मुंडे या तिघींना लोकसभेची उमेदवारी दिली होती. परंतु या तिन्ही महिलांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असूनही महिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होण्यासाठी भाजपानं या महिलांना स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट केलं. राज्यात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे. विरोधक या योजनेवरून नकारात्मक टीका करत आहेत. त्यामुळंच या योजनेचा निवडणुकीत पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी भाजपानं या महिला नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे.
मानाचं स्थान न दिल्यानं आठवले नाराज? : मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मित्र पक्षांच्याही काही नेत्यांची नावं होती. रिपाइंचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना या यादीत मानाचे स्थान होते. परंतु यंदा विधानसभेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं. महायुतीत जागा वाटपात त्यांना योग्य स्थान देण्यात यावं, अशी आठवले यांची मागणी होती. परंतु त्यांच्या या मागणीकडं महायुतीच्या नेत्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्यानं महायुतीचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका सध्या तरी आठवले यांनी घेतली आहे.
केंद्रातील स्टार प्रचारकांची नावे
1) नरेंद्र मोदी
2) जे.पी. नड्डा
3) राजनाथ सिंह
4) अमित शाह
5) नितीन गडकरी
6) योगी आदित्यनाथ
7) डॉ. प्रमोद सावंत
8) भुपेंद्र पटेल
9) विष्णू देव साई
10) डॉ. मोहन यादव
11) भजनलाल शर्मा
12) नायब सिंग साईनी
13) हिमंता बिस्वा सर्मा
14) शिवराज सिंह चौहान
15) ज्योतिरादित्य सिंधिया
16) स्मृती इराणी
17) शिव प्रकाश
18) भूपेंद्र यादव
19) अश्विनी वैष्णव
20) पियुष गोयल
महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची नावे*
1) देवेंद्र फडणवीस
2) विनोद तावडे
3) चंद्रशेखर बावनकुळे
4) रावसाहेब दानवे
5) अशोक चव्हाण
6) उदयनराजे भोसले
7) नारायण राणे
8) पंकजा मुंडे
9) चंद्रकांत दादा पाटील
10) आशिष शेलार
11) सुधीर मुनगंटीवार
12) राधाकृष्ण विखे पाटील
13) गिरीश महाजन
14) रविंद्र चव्हाण
15) प्रवीण दरेकर
16) अमर साबळे
17) मुरलीधर मोहळ
18) अशोक नेते
19) डॉ. संजय कुटे
20) नवनीत राणा
हेही वाचा -
- भाजपाची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर, ठाकरेंनीही तीन उमेदवार केले जाहीर
- "घाबरवण्यासाठी छापेमारी"; अनिल देशमुखांनी लिहिलेलं पुस्तक आलं समोर, देवेंद्र फडणवीस पुन्हा टार्गेटवर