मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच महाराष्ट्रातून मुंबईला तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या राज्यात सर्वात मोठे परप्रांतीय हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच आहेत. इतके असतानाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना मदत करीत आहेत, असा घणाघात उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलाय. यासोबतच 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कच्या मैदानावरून शिवतीर्थावर तणाव निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवलीय. मुंबईत ते बोलत होते.
मनसेची सभा होण्याची शक्यता :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता 18 नोव्हेंबरला होत असून, आदल्या दिवशी 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान हे प्रचाराकरिता मिळावे, यासाठी उबाठा गटाने त्याचबरोबर मनसेने मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केलाय. 17 नोव्हेंबर रोजी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या कारणाने हजारो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर नमन करण्यासाठी शिवतीर्थावर येत असतात. आता याच मैदानासाठी दोन्ही ठाकरे बंधू आग्रही झाल्याने मोठा पेच निर्माण झालाय. हे मैदान प्रचारासाठी कुणाला द्यायचे याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरीसुद्धा या मैदानावर प्रचार सभा घेण्यासाठी महापालिकेकडे 15 ते 16 अर्ज प्राप्त झालेत.