पुणे-महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीनं एकतर्फी बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची पिछेहाट झालेली पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा सुरू झालीय. याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, आता महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेलं आहे. जर केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला म्हटलं की, महायुतीत भाजपाचा मुख्यमंत्री ठरवायचं झालं तर आम्ही एकमुखाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊ, असंही यावेळी पाटील म्हणालेत.
भरून पावल्यासारखं आज वाटतंय :पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचं एक लाख 11 हजार मतांनी पराभव केलंय. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात जसं म्हणतात ना भरून पावलो तसं आज वाटत आहे. कसबा जिंकला असून, सगळा हिसाब किताब हा चुकता केला आहे. तसेच कोथरूडमध्ये आम्ही सगळे रेकॉर्ड मोडलेत, याचं श्रेय कार्यकर्ते आणि त्यांच्या घरातील लोकांना देत आहोत. जी व्होट बँक भारतीय जनता पक्षाची कधीच नव्हती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलीय आणि त्याचा फायदा या निवडणुकीत आम्हाला मिळालाय. तसेच या निवडणुकीत पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांची दांडी कधी गुल झाली हे त्यांनाच कळलंच नाही, असा टोला यावेळी पाटील यांनी लगावलाय.
...म्हणून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय :राज्याच्या निकालाबाबत पाटील म्हणाले की, 2019 साली महायुतीला जो लोकांनी कल दिला होता आणि त्याचा उद्धव ठाकरे यांनी अनादर केलेला होता, त्याचा राग आणि लोकसभेत लोकांची जी दिशाभूल करण्यात आली, त्याचा राग जनतेनं या निवडणुकीत काढला आणि त्यामुळेच महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय. तसेच पक्ष मला जी काही जबाबदारी देईल ती मी पार पाडेन, असंही यावेळी पाटील म्हणालेत.
भाजपाचा मुख्यमंत्री ठरल्यास आम्ही एकमुखाने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊ- चंद्रकांत पाटील - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
जर केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला म्हटलं की, महायुतीत भाजपाचा मुख्यमंत्री ठरला तर आम्ही एकमुखाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊ, असंही यावेळी पाटील म्हणालेत.
चंद्रकांत पाटील (Source- ETV Bharat)
Published : Nov 23, 2024, 8:23 PM IST