मुंबई -विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी एक आठवडा उलटून गेल्यानंतरही सरकार स्थापन होत नव्हतं. शपथविधीसुद्धा लांबणीवर गेला होता. मात्र अखेर पाच डिसेंबर (गुरुवारी) महायुतीचा भव्यदिव्य असा शपधविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, आज भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदाची नियुक्ती करण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर या तिघांमध्ये बैठक झाली. दरम्यान, यानंतर महायुतीतील नेत्यांनी राजभवन येथे जात राज्यपालाकडे आमदारांच्या संख्याबळाचं आणि बहुमत स्पष्ट असल्याचं पत्र राज्यपालांना सुपूर्द केलं. राज्यापालांनी सरकार स्थापनेसाठी महायुतीला गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता वेळ दिलीय. दरम्यान, नवीन सरकार येण्यापूर्वी या सरकारची ही शेवटची पत्रकार परिषद एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलीय.
शिंदे सरकारमध्ये राहतील :सुरुवातीला बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी उद्या सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ दिलीय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी आमची मोठी महायुती आहे. या सर्वांच्या सहीचे पत्र राज्यपालांना दिलंय. आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर उद्या शपथविधी पार पडणार आहे. एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, अशी मी त्यांना काल विनंती केलीय. एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. सर्व घटक पक्षांनी आणि महायुतीतील नेत्यांनी मागील काळापासून पाठिंबा दिलाय. सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार देवेंद्र फडणवीसांनी मानलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आम्ही तिघे मिळून एकत्र सरकार चालवणार आहोत. मुख्यमंत्री हे पद तांत्रिक पद आहे. तिघं मिळून सरकारमध्ये एकत्र काम करून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने अधिक पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. जी विकासाची काम अर्धवट राहिलीत, ज्या प्रकल्पांचे काम बाकी आहेत, त्यांचं पण कामं प्रगतिपथावर नेणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.
मी मात्र शपथ घेणार- अजितदादा :दरम्यान पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंना विचारलं की, तुम्ही सत्तेत सहभागी होणार का किंवा उद्या शपथविधी घेणार का? यावर बोलताना शिंदे म्हणाले की, थोडं थांबा, कळ सोसा. संध्याकाळपर्यंत समजेल, एवढ्यात बाजूला बसलेले अजित पवार म्हणाले की, शिंदे सत्तेत सहभागी होणार की शपथ घेणार हे संध्याकाळपर्यंत समजेल, मी मात्र शपथ घेणार आहे, असं अजित पवारांनी म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजितदादांना सकाळी अन् संध्याकाळी पण शपथ घेण्याचा अनुभव आहे, असा मिश्कील टोलाही एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना लगावलाय.