मुंबई -राज्यातील १४ वी विधानसभा लवकरच बरखास्त होणार असून, १५ व्या विधानसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. २० नोब्हेंबरला मतदान प्रक्रिया तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होताना दिसत आहे. तर तिसऱ्या आघाडीनेही आव्हान देण्यास सुरुवात केलीय. निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना शैक्षणिक आणि सामाजिक माहितीसोबतच वय, कुटुंबाची माहिती, संपत्ती आणि व्यवसायाचीही नोंद केली जातेय.
९७ आमदार हे उद्योजक अन् व्यापारी : विशेष म्हणजे राज्याच्या १४ व्या विधानसभेतील २८८ आमदारांपैकी विधिमंडळ सचिवालयाच्या नोंदीनुसार १०४ आमदारांचा व्यवसाय शेती आहे, तर ९७ आमदार हे उद्योजक अन् व्यापारी आहेत. तसेच ५० आमदारांचा व्यवसाय राजकीय आणि सामाजिक कार्य असल्याचे नमूद केलंय. या विधानसभेत मध्यमवयीन आमदारांची संख्याही लक्षणीय असून, ती १०० पेक्षा अधिक असल्याचे विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांनी सांगितलंय.
आमदारांचा व्यवसाय व शिक्षण : १४ व्या विधानसभा निवडणुकीत २८८ आमदारांपैकी शेतकरी, उद्योजक आणि व्यापारी, राजकीय आणि सामाजिक कार्य, वकील, वैद्यकीय क्षेत्र, बांधकाम विकासक आहेत. यामध्ये १०४ आमदारांचा व्यवसाय शेती आहे. तर ९७ उद्योजक आणि व्यापारी आहेत. विशेष म्हणजे ५० आमदारांचा व्यवसाय राजकीय आणि सामाजिक कार्य आहे. ३ आमदार वकील, ७ वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आणि १२ आमदार बांधकाम व्यावसायिक आहेत, उर्वरित आमदार नागरी सेवा आणि इतर क्षेत्रातील नामांकित आहेत. महिला आणि पुरुष आमदारांचा यात समावेश आहे. शिक्षित आणि उच्च शिक्षित आमदारांचादेखील यात सहभाग आहे. त्यानुसार ८३ आमदार पदवीधर, १६ आमदार पदव्युत्तर पदवीधारक, २१ आमदार पदविका धारक, १९ आमदार बारावी उत्तीर्ण, २९ आमदार दहावी उत्तीर्ण आहेत. ७ आमदारांनी वैद्यकीय पदव्या घेतल्यात. एक आमदार एम फील आणि ६ आमदारांकडे पीएचडी पदव्या आहेत. तसेच अनेकांनी अभियांत्रिकी आणि कायद्याचे शिक्षण घेतल्याची नोंद असल्याची माहिती सचिवांनी दिलीय.